जिओने मारली ५ जी लिलावात बाजी
जिओने फाईव्ह जी स्पेक्ट्रम लिलावात ७००,८००,१८००,३३०० व २६ जीएचझेड बँड स्पेक्ट्रमच्या लिलावासाठी सर्वाधिक बोली लावून बाजी मारली आहे. कमीत कमी वेळात फाईव्ह जी रोल आऊट करण्याची जिओची तयारी पूर्ण झाली असून त्यासाठी त्यांनी अगोदरच देशभरात फायबर जाळे पसरविले आहे. जिओ आज घडीला देशातील सर्वात मोठी डिजिटल सेवा प्रोव्हायडर आहे. जिओने लिलावात सर्वाधिक बोली लावून बाजी मारल्याने जगातील सर्वात अॅडव्हान्स्ड फाईव्ह जी नेटवर्क बनविणे, वायरलेस ब्रॉडबँड कनेक्टीव्हिटी मध्ये भारताला जागतिक नेतृत्व करण्यास अधिक मजबूत बनविण्यास मदत मिळणार आहे.
सहा वर्षापूर्वी लाँच झालेल्या जिओने कमीत कमी वेळात फोर जी नेटवर्क रोल आऊट करून जागतिक रेकॉर्ड बनविले होते. जिओचे अध्यक्ष आकाश अंबानी म्हणाले,’ फोर जी नेटवर्क रोल आउट करताना आम्ही अनेक रेकॉर्ड नोंदविली. ४० कोटी पेक्षा अधिक ग्राहकांना सर्वात स्वस्त नेटवर्क देण्याचे रेकॉर्ड आम्ही केले . आता फाईव्ह जी नवे रेकॉर्ड करेल. प्रत्येक भारतीयाला जगात कुठेही मिळणाऱ्या सर्वात उत्तम डिजिटल सेवा व प्लॅटफॉर्म पर्यंत पोहोचणे आता शक्य होणार आहे. भारत सफल तंत्रज्ञान शक्ती स्वीकारून जगात अग्रणी आर्थिक शक्ती बनेल असा विश्वास आहे. आम्ही फाईव्ह जी च्या नेतृत्वासाठी तयार आहेत. पूर्ण भारतात फाईव्ह जी रोल आउट करून ‘आझादी का अमृतमहोत्सव’ आम्ही साजरा करणार आहोत.
या स्पेक्ट्रमचा वापर वीस वर्षे करता येणार असून त्यासाठी जिओने ८८०७८ कोटी रुपयांची बोली लावली होती. ही रक्कम २० समान वार्षिक हप्त्यात भरायची असून त्याची व्याज मोजणी ७.२ टक्के प्रतिवर्ष अशी होणार आहे.