शिवसेना खासदार संजय राऊत यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी


मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाने आज शिवसेना नेते संजय राऊत यांना अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले आणि याप्रकरणी अधिक चौकशीसाठी त्यांच्या कोठडीची मागणी केली. न्यायालयाने एजन्सीची कोठडीची मागणी मान्य केली असून शिवसेना नेत्याला 3 दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. मुंबईच्या उत्तर उपनगरातील चाळ प्रकल्पाच्या पुनर्विकासाशी संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी ईडीने त्यांना ताब्यात घेतले आहे.

युक्तिवादादरम्यान ईडीच्या वकिलांनी राऊत यांच्यावर केले हे आरोप
युक्तिवादादरम्यान, ईडीच्या वकिलांनी युक्तिवाद केला की गुरु आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडचे माजी संचालक प्रवीण राऊत यांनी एक पैसाही गुंतवला नाही, तरीही त्यांना 112 कोटी रुपये मिळाले. संजय आणि वर्षा राऊत यांच्या खात्यात 1.6 कोटी रुपये ट्रान्सफर झाल्याचे तपासात उघड झाले आहे. राऊत आणि कुटुंबीय 1.6 कोटी रुपयांचे लाभार्थी होते. ईडीचे वकील हितेन वेणेगावकर यांनी न्यायालयाला सांगितले की, या रकमेतून (1.6 कोटी रुपये) अलिबागच्या किहीम बीचवर एक भूखंड खरेदी केल्याचे तपासात समोर आले आहे. सपना पाटकर यांच्या नावावर भूखंड घेण्यात आला. प्रवीण राऊत हा संजय राऊतचा फ्रंट मॅन असल्याचेही तपासात समोर आले आहे.

राऊत यांच्या घरात सापडली 11 लाखांची रोकड
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) रविवारी रात्री उशिरा शिवसेना नेते संजय राऊत यांना अटक केली. दरम्यान, संध्याकाळी उशिरा ईडीच्या सूत्रांनी दावा केला की, राऊत यांच्या घरातून 11.5 लाख रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त करण्यात आली आहे. दुसरीकडे, पात्रा चाळ प्रकरणात ईडीच्या साक्षीदार स्वप्ना पाटकरला धमकावल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी रविवारी स्वतंत्रपणे खासदाराविरुद्ध एफआयआर नोंदवला. एफआयआर राऊत आणि पाटकर यांच्यातील कथित संभाषणाच्या ऑडिओ रेकॉर्डिंगवर आधारित आहे. मुंबई पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, भारतीय दंड संहितेच्या कलम 504 आणि 509 अंतर्गत वाकोला पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. राऊत यांनी तिला धमकावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पाटकर यांनी केला आहे.