आली दुनियेतील सर्वात छोटी पोलीस इलेक्ट्रिक कार

इलेक्ट्रिक वाहनांची मागणी जगभरात वाढत आहे आणि ग्लोबल बाजारात अनेक प्रवासी इलेक्ट्रिक वाहने रोज मोठ्या प्रमाणावर दाखल होत आहेत. अलिबाबा इव्हीने दुनियेतील सर्वात छोटी इलेक्ट्रिक कार पेश केली असून ही पोलीस कार आहे. अलीबाबाने आजपर्यंत अनेक युनिक इव्ही पेश केल्या आहेत पण इलेट्रेकच्या रिपोर्टनुसार ही चिमुकली पोलीस इलेक्ट्रिक कार आकाराने लहान असली तरी एकापेक्षा एक अॅडव्हान्स्ड फीचर्सनी परिपूर्ण आहे.

या कारसाठी २.८ केडब्ल्यू इलेक्ट्रिक मोटार आणि ६० व्ही १२० एएच बॅटरी पॅक दिला गेला आहे. सिंगल चार्ज मध्ये ही कार १४० किमी रेंज देते आणि रोजच्या वापरासाठी अगदी परफेक्ट आहे. या कारची बॅटरी कमी वेळात आणि कमी वीज वापरून फुल चार्ज होते. हिचा टॉप स्पीड आहे ताशी ४५ किमी. या कार मध्ये दोन लोक बसू शकतात. ५८० किलो वजनाच्या या कारची किंमत ३४५० ते ५ हजार डॉलर्स आहे. कारची जादा युनिट खरेदी केली म्हणजे एकदम अनेक युनिट खरेदी केली तर किंमत कमी होणार आहे.

या कारसाठी स्लायडिंग विंडोज, स्टिरीओ सिस्टीम, अॅडजस्ट होणारे सनरुफ दिले गेले असून हवा खेळती हवी असेल तर सनरुफ उघडावे लागेल. या कारला थ्री पॉइंटेड सीट बेल्ट, डिस्क ब्रेक दिले गेले आहेत. ही कार सध्या फक्त चीन मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.