अंतराळात होणार स्पेस स्टेशन्सची गर्दी

रशिया युक्रेन युद्ध सुरु झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन मधून रशिया २०२४ पर्यंत बाहेर होणार असल्याची घोषणा केली गेली आहे. यामुळे आता नव्या अंतराळ स्पर्धेची सुरवात झाली असून रशिया स्वतःचे स्वतंत्र अंतराळ स्टेशन उभे करण्याचे काम करत आहे. दुसरीकडे चीनचे अंतराळ स्टेशन जवळ जवळ पूर्ण झाले आहे. परिणामी अंतराळात अंतराळ स्टेशन्सची गर्दी आगामी काळात होऊ शकते असे संकेत मिळाले आहेत.

गेल्या दोन दशकात अंतराळ स्टेशन्सचे महत्व वाढले आहे. त्यामुळे भविष्यात त्यांची संख्या वाढणार यात संशय नाही असे अंतराळ तज्ञ म्हणत आहेत. २४ वर्षांपूर्वी अमेरिका रशिया यांनी अन्य देशांसह आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचे काम सुरु केले होते. तेव्हा त्यात चीन सामील नव्हता. चीनने आता स्वतःचे अंतराळ स्थानक स्थापित केले आहे आणि काही महिन्यात ते काम सुरु करेल. या स्थानकावर नासा किंवा अमेरीकेचा प्रभाव नाही.

या वर्षीच्या फेब्रुवारीत रशिया युक्रेन युद्ध सुरु झाल्यावर  रशियावर अमेरिकेसह अनेक देशांनी निर्बंध लागू केले आणि रशियाने आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन मधून रशिया २०२४ मध्ये बाहेर पडेल अशी घोषणा केली. रशियाच्या स्पेस एजन्सी रोसकोसमॉसचे प्रमुख दिमित्री यांनी एका हल्ल्यात अंतराळ स्टेशन पाडू शकतो आणि ते आशिया किंवा चीनवर पडेल अशी धमकी दिली होती शिवाय रशियाच्या सहकार्याशिवाय आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशन वाचू शकत नाही असेही म्हटले होते. मात्र रशिया स्वतःचे स्वतंत्र अंतराळस्थानक बनविण्याच्या दृष्टीने वेगाने काम करत असल्याचे सांगितले जात आहे.

दुसरीकडे अमेरिका आणि नासा पृथ्वीच्या खालच्या कक्षेवरचे त्यांचे वर्चस्व हातून जाऊ देणार नाही आणि त्यामुळे आणखी एक स्वतंत्र अंतराळ स्थानक उभे करेल असे म्हटले जात आहे.