‘वंदे भारत’ ट्रेनसाठी टाटा स्टील पुरविणार अत्याधुनिक सीट्स
देशातील अग्रणी टाटा स्टील ‘वंदे भारत’ ट्रेनसाठी खास सीट्सचा पुरवठा करणार आहे. सप्टेंबर पासून या सीट्सचा पुरवठा सुरु होणार आहे. टाटा स्टीलचे उपाध्यक्ष देवाशिष भट्टाचार्य यांनी दिलेल्या माहितीनुसार देशात अश्या प्रकारची आसन व्यवस्था प्रथमच उपलब्ध होत आहे. टाटा स्टीलला वंदे भारत च्या २२ गाड्यांसाठी या सीट्स बनविण्याचे कंत्राट दिले गेले असून त्यासाठी १४५ कोटी रुपये खर्च येणार आहे.
या सीट्सचे डिझाईन खास प्रकारचे असून या सीट १८० डिग्री मध्ये फिरू शकतात. विमानातील आसनाप्रमाणे ही सुविधा आहे. या सीट फायबर रीइंफोर्स्ड पॉलिमरपासून बनविल्या गेल्या आहेत. यांचा देखभाल खर्च अगदी कमी असून त्या आरामदायी आहेत. शिवाय या सीट मुळे प्रवाशांची सुरक्षा वाढणार आहे. वंदे भारत या ताशी १३० किमी वेगाने धावू शकणाऱ्या ट्रेन्स देशातील सर्वात वेगवान ट्रेन पैकी आहेत.
देवाशिष भट्टाचार्य यांनी टाटा स्टील संशोधन विकास विभागसाठी २०२५-२६ पर्यंत ३००० कोटींची गुंतवणूक करत असल्याचे सांगितले. ते म्हणाले, २०३० पर्यंत जगातील टॉप पाच स्टील कंपन्यांमध्ये टाटा स्टीलला सामील करण्याचे ध्येय आहे त्यामुळे ही गुंतवणूक केली जात आहे. महाराष्ट्रातील खोपोली जवळ एक नवीन प्रकल्प उभारला जात असून त्यात नेदरलंड कंपनी तांत्रिक भागीदार आहे. येथे सँडविच पॅनल्स बनविली जाणार असून त्याचा वापर रेल्वे आणि मेट्रो कोच मधील इंटिरीअर साठी केला जातो.