अशी दिली जातात वाघांना नावे

भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे वाघ. गेली सुमारे ५० वर्षे कमी झालेली वाघांची संख्या वाढावी म्हणून खास प्रयत्न केले जात आहेत. देशात सुमारे ५० ठिकाणी व्याघ्र प्रकल्प सुरु केले गेले आहेत आणि तेथे वाघांची जोपासना योग्य होईल याची काळजी घेतली जात आहे. या वाघांना खास नावे दिली गेली आहेत. या टायगर रिझर्व्ह किंवा अभयारण्यात काम करणारे वनअधिकारी, कर्मचारी, आसपासच्या परीसरातील रहिवासी किंवा पर्यटक वाघांना विशिष्ट नावाने ओळखतात.

यातील काही वाघ आणि वाघिणी विशेष लोकप्रिय झाल्या आहेत. अगदी जंगल सफारी मधील पर्यटक, गाईड, कर्मचारी या वाघांविषयी बोलताना एकाद्या माणसाच्या नावाप्रमाणे त्याची नावे घेऊन बोलतात. भारतातील वाघांना कोड नावाऐवजी माणसांसारखी विशेष नावे दिली गेली आहेत. अशी नावे देताना त्या त्या वाघांच्या अंगावरील विशेष खुणा, त्यांच्या विशेष सवयीवरून दिली जातात. राजस्थानच्या रणथांबोर मधली ‘मच्छली’ला तिचे नाव तिने मछली नावाच्या एका मगरीला ठार केले त्यावरून दिले गेले. तिच्या आईच्या गालावर माशासारखी खूण होती. बीबीसीच्या टीमने त्यावर एक फिल्म तयार केली होती. आता या मच्छलीच्या मुलीला ज्युनीअर मच्छली असे नाव असून तिच्या डोक्यावर बाणासारखी खूण आहे.

पेंच अभयारण्यातील कॉलरवाली तिच्या गळ्यात घातलेल्या कॉलर मुळे प्रसिद्ध होती. या कॉलरवालीने एकूण २९ पिले जन्माला घातली होती आणि जागतिक रेकॉर्ड केले होते. यामुळे नंतर तिला माताराम असेही म्हटले जात होते.

ताडोबाच्या जंगलातील माया वाघीण. तिच्या खांद्यावर इंग्रजी एम प्रमाणे आकृती होती. पर्यटकांत ही वाघीण लोकप्रिय होती. एका वाघाचे नाव मटकासूर होते. येथील आदिवासी सांगतात त्याप्रमाणे हा वाघ मटक्यातील दारू पित असे अशी अफवा होती. कान्हा अभयारण्यात मुन्ना नावाचा एक वाघ होता. दुसर्या वाघाशी लढाई करताना त्याचा एक पाय जखमी झाला होता आणि त्यामुळे तो लंगडत असे.