केसगळती रोखण्यासाठी करा हे उपाय..


सतत केस गळणे हा एक अतिशय त्रासदायक अनुभव असतो. केस गळण्यामागे अनेक कारणे असू शकतात. क्वचित प्रसंगी उद्भविलेले गंभीर आजार, किंवा त्यांच्या औषधांचे दुष्परिणाम, प्रदूषण, अयोग्य आहार, मानसिक ताण, अशी किती तरी कारणे केस गळतीमागे असू शकतात. या व्यतिरिक्त अजून ही काही कारणांमुळे केसगळती उद्भवू शकते.

सर्वप्रथम, आपला स्काल्प कशा पद्धतीचा आहे हे समजून घेऊन मगच त्यानुसार योग्य शॅम्पूची निवड करावी. स्काल्प आधीच कोरडा असेल, तर वरचेवर शॅम्पू वापरण्याचे टाळावे. केस अति धुण्याने तुटू शकतात. त्याचप्रमाणे ज्यांचा स्काल्प तेलकट आहे, त्यांनी आठवड्यातून तीन वेळा केस धुवायला हवेत. आपण वापरत असेलेल्या शॅम्पू मध्ये नक्की कुठली रसायने वापरली गेली आहेत हे ही समजून घेणे महत्वाचे आहे. सल्फेट, पॅराबेन, सिलीकोन इत्यादी तत्वे असणारे शॅम्पू वापरल्याने केस कोरडे, रखरखीत होऊन तुटू शकतात. त्याचबरोबर आपल्या केसांसाठी योग्य कंडीशनर निवडून त्याचा नियमित वापर करावा.

आपण आपल्या केसांसाठी कितीही महागडी प्रसाधने वापरली, तरी केसांना जोवर शरीराच्या आतमधून पोषण मिळत नाही, तो पर्यंत केसगळती थांबविणे कठीण असते. त्यासाठी योग्य आहार आणि नियमित व्यायाम यांची गरज आहे. आपल्या आहारामध्ये भरपूर प्रथिनांचा आणि लोहाचा समावेश करा. वजन घटविण्यासाठी केलेल्या क्रॅश डायट्स मुळेही केस गळती सुरु होऊ शकते. त्यामुळे आपल्या आहारामध्ये अचानक खूप सारे बदल करणेही योग्य नाही. व्यायामामुळे शरीराचे रक्ताभिसरण चांगले राहते. याचाच फायदा आपल्या केसांनाही होत असतो.

आजकाल पार्लर मध्ये जाऊन आपल्या केसांवर अनेक प्रकारच्या रासायनिक प्रक्रिया करून घेणाऱ्या महिला किंवा तरुण मुली आपण पाहतो. त्या रासायनिक प्रक्रियांमुळे केस तात्पुरते चांगले दिसत असले, तरी कालांतराने या रसायनांचे दुष्परिणाम केसांवर दिसून येतात. केस अकाली पिकणे, रुक्ष होणे आणि तुटणे सुरु होते. ज्यांना हेयर ड्रायर वापरण्याची सवय असते, त्यांनी ही ड्रायर आपल्या केसांच्या अगदी जवळ धरण्याचे टाळावे. ड्रायर केसांच्या खूप जवळ धरल्याने केस कोरडे होऊन तुटण्याची शक्यता असते.

केसांना तेल लावणे हे केसांच्या आरोग्याकरिता अतिशय गरजेचे आहे. तेल लाऊन केलेल्या मसाज मुळे केसांच्या मुळांशी रक्ताभिसरण चांगले होते. तसेच केसांनाही तेलामुळे आर्द्रता मिळते. आठवड्यातून किमान एकदा तरी केसांना तेल लाऊन मसाज केल्यास केसांची वाढ चांगली होऊन केस गळण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. तेल कोमट करून हळुवार हातांनी केसांच्या मुळांशी आणि केसांना लावावे आणि त्यानंतर तासाभराने चांगल्या प्रतीचा शॅम्पू वापरून केस धुवावेत. लांब केस असणाऱ्यांनी आपले केस साधारणपणे दर आठ ते दहा आठवड्यांनी ‘ट्रिम’ करावेत, म्हणजे अगदी थोडेसे कापावेत. त्यामुळे केस टोकाशी दुभंगण्याची ( split ends ) शक्यता कमी असते.

केस गळतीचे अजून एक महत्वाचे कारण म्हणजे मानसिक तणाव असणे. मानसिक तणाव असणाऱ्या व्यक्तींना केस गळती, केस अकाली पिकणे, अकाली टक्कल पडणे असले त्रासही सुरु होतात. मानासिक ताण कमी करण्यासाठी योगसाधना, ध्यानधारणा आदिंचा अवलंब करावा.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment