कधीही न उलगडलेली दुनियेतील रहस्य


मनुष्य आता अंतरिक्षात, चंद्रावर, मंगळावर देखील पोहोचला आहे. अवकाशयाने अंतरिक्षामध्ये पाठवून आपल्या दुनियेच्या बाहेरील रहस्य्यांची उकल करण्यात जरी शास्त्रज्ञांना यश येत असले, तरी या जगामध्ये काही रहस्ये अशी आहेत जी मानवी आकलनाच्या पलीकडे आहेत. या रहस्यमयी घटनांच्या मागे नेमकी काय कारणे असावीत, हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. या घटना आजही न उकललेले कोडे बनून राहिल्या आहेत.

‘ताओस हम’ हे रहस्य, न्यू मेक्सिको मधील ताओस या छोट्याशा शहराशी निगडीत आहे. या शहराच्या वेशीच्या बाहेर डीजेल इंजिन चालत असल्याप्रमाणे आवाज येत असतात. हे आवाज सर्व रहिवाशांना अगदी स्पष्टपणे ऐकू येतात. पण खूप शोध घेऊनही हा आवाज नक्की कुठून येतो आहे याचा उलगडा आजतागायत झालेला नाही. स्थानिक रहिवाश्यांनी अगदी आधुनिक यंत्रांची मदत घेऊनही ह्या आवाजाच्या स्रोतापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात त्यांना यश आले नाही. या डीजेल इंजिनाच्या आवाजाला ‘ताओस हम’ या नावाने ओळखले जाते.

निरनिराळ्या संस्कृतींचा विकास कसा झाला असावा या संबंधी पुरातत्वज्ञांनी अनेक शोध लावले आहेत. त्या त्या संस्कृतींमधील राहणीमान, जीवनशैली, कला, या बाबतीतही अनेक शोध लागले. पण ‘वायनिश’ नावाची लिपी मात्र जाणकारांना आजतागायत उलगडलेली नाही. या लिपीस लिहिणारा किंवा वाचणारा कोणीच आज अस्तित्वात नाही. या लिपीबद्दल थोडेफार ज्ञान मिळते, ते त्या लिपीच्या पुस्तकांमध्ये बनलेल्या चित्रांवरून. पण या लिपीबद्दल बाकी कुठलीच माहिती उपलब्ध नाही.

‘जॅक द रिपर’ या नावाचे आजवर अनेक चित्रपट, नाटके आणि मालिका हॉलीवूडमध्ये बनल्या आहेत. ही कहाणी अठराव्या शतकातील लंडन मध्ये घडलेल्या भयंकर खुनी सत्रावर आधारित आहे. रात्री अपरात्री लंडन मधील रस्त्यावरून हिंडणाऱ्या एकाकी स्त्रियांचा, हा इसम खून करीत असे. हे खूनही फार भीषण पद्धतीने केले जात असत. पण विशेष गोष्ट अशी, की इतक्या स्त्रियांचा बळी गेल्यानंतरही त्यांचे खून करणारा इसम नक्की कोण होता याचा शोध कधीही लागला नाही. खून झालेल्या बहुतेक सर्व स्त्रिया देहविक्रय करणाऱ्या होत्या. त्यांचा खून करून हा इसम त्यांची शरीरे इतके छिन्नविछिन्न करून टाकत असे, की त्यांची ओळख पटणे अशक्य होऊन जाई. खूप शोध घेऊनही या खुनांमागे नक्की कोण होते हे आजही न उकललेले गूढ आहे.

‘द लॉख नेस मॉन्स्टर’ या रहस्यमयी समुद्री जीवाबद्दलच्या अनेक आख्यायिका पश्चिमी देशांमध्ये सांगितल्या जातात. हा समुद्री जीव नक्की कसा आहे याची कल्पना करून अनेक जणांनी अनेकप्रकारे ती कल्पना प्रत्यक्षात मांडण्याचा प्रयत्न केला. कोणी चित्रे रेखाटली, तर कुणी व्हिडीओ तयार केले. कोणी हा समुद्री जीव एक महाकाय डायनॉसॉर असल्याचे म्हटले, तर कोणी तो भलामोठा साप आहे असे सांगितले. पण हा समुद्री जीव नक्की आहे तरी कसा हे मात्र प्रत्यक्षात कोणीही शोधून काढू शकले नाही. हा जीव कधी पाण्याच्या वर कधी खोलवर पाण्यात आजही दिसून येत असल्याचे सांगण्यात येते.

Leave a Comment