काम अन् वेळेचे नियोजन करा


सध्याच्या धावपळीच्या युगात कामे भरपूर आणि वेळ कमी अशी परिस्थिती असते. या गोंधळात तुम्हाला प्रत्येक कामाचे नियोजन, वेळेचे नियोजन करावे लागते. यासाठी काही मूलभूत गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात.

कामाचे योग्य वाटप – कार्यालयातील प्रत्येक काम जर तुम्हीच पूर्ण करायचे असा प्रयत्न असेल, तर त्याचा तुम्हाला काहीही फायदा नाही. यामध्ये वेळेचा अपव्यय जास्त होतो. प्रत्येक योग्य व्यक्तीकडे काम देऊन स्वतः महत्त्वाचे काम करण्याकडे लक्ष द्या.

पोमोडोर टेक्‍निक – पोमोडोर टेक्‍निक हे वेळेच्या व्यवस्थापनासाठीचे एक कौशल्य आहे. याच तंत्राचा उपयोग करून जगातील अनेक यशस्वी व्यक्ती काम करतात. हे तंत्र 1980 च्या दशकात फ्रान्सेस्को सईलोने विकसित केले. या तंत्रात एका टायमरच्या साह्याने कामांची विभागणी लहान लहान वेळेच्या तुकड्यांमध्ये केली जाते. यांत छोटे- छोटे विश्राम, 25 मिनिटे सलग कामाचा एक पोमोडोर तयार केला जातो. आपला मेंदू हा 25 मिनिटे सलग एखाद्या कामावर लक्ष केंद्रित करू शकतो. त्यानंतर विश्राम घेणे आवश्‍यक असते.

कार्यालय आणि घर यातील अंतर – तुमचे कार्यालय आणि घर यामध्ये खूप अंतर असेल तर मधल्या प्रवासात खूप वेळ वाया जातो. हा वेळ चांगले उत्पन्न मिळणाऱ्या दुसऱ्या कामात व्यतीत करू शकता. कामाचे ठिकाण लांब असेल आणि तुम्ही स्वतःच वाहन चालवीत जात असाल तर अनुत्पादित, वेळ वाया घालवणारे काम आहे.

छंदाला प्राधान्य – कार्यालयीन कामासोबत आपल्या आवडीच्या गोष्टींसाठीदेखील पुरेसा वेळ देणे गरजेचे असते. तुम्हाला जर वाचनाचा छंद असेल, पण जर पुस्तके वाचायला वेळ मिळत नसेल, तर सध्या ऑडिओ बुक्‍सचा पर्याय निवडू शकता. ही पुस्तके तुम्ही कधीही चालता- फिरता, प्रवासात ऐकू शकता. तुम्हाला संगीताची किंवा एखाद्या वाद्याची आवड असेल, तर तुमच्या कार्यालयाजवळच त्याचे क्‍लासेस शोधा. जेव्हा तुम्ही तुमच्या आवडीच्या कामात काही वेळ देता, तेव्हा दिवसभर तुम्ही उत्साहित, ताजेतवाने असता आणि कार्यालयीन कामेही चांगल्या पद्धतीने पूर्ण होतात.

Leave a Comment