बहुगुणकारी सीताफळ


आपण जाणून घेऊ या एका अश्या फळाबद्दल ज्याच्या सेवनाने केसांशी निगडीत सर्व समस्या दूर होण्यास मदत मिळते, तसेच नंतर या समस्या पुनश्च उद्भवत नाहीत. केसांच्या आरोग्याशी निगडीत समस्या, अनेक प्रकारच्या असू शकतात. केस पिकणे, गळणे, अकाली टक्कल पडणे या सर्व समस्यांपासून या फळाच्या सेवनाने फायदा होऊ शकतो. हे फळ म्हणजे सीताफळ. सीताफळ हे चवीला अतिशय मधुर असते. ऑगस्ट ते नोव्हेंबर महिन्यांच्या दरम्यान हे फळ येते. आयुर्वेदाच्या अनुसार सीताफळाच्या सेवनाने शरीरातील उष्णता कमी होऊन शरीराला थंडावा मिळतो. जर सतत उलट्यांचा त्रास होत असेल तर सीताफळ खाल्ल्याने आराम पडतो. छातीत साठलेला कफ कमी करण्यासाठी आणि हृदयाच्या स्वास्थ्यासाठी सीताफळ गुणकारी आहे.

सीताफळाला हे नाव कसे पडले यामागे एक कथा सांगितली जाते. सीतेने वनावासामध्ये असताना हे फळ प्रभू रामचंद्राना भेट दिले, आणि त्यावरूनच या फळाचे नाव सीताफळ पडले अशी आख्यायिका आहे. सीताफळा चे सेवन अनेक विकारांमध्ये हितकारी आहे. कच्चे सीताफळ चिरून, वाळवून, त्याची बारीक पूड करून ठेवावी. डायरिया झाला असल्यास सीताफळाच्या पुडीने गुण येतो. सीताफळ हे एक औषधी फळ आहे. ज्या व्यक्ती शरीराने दुबळ्या किंवा किडकिडीत असतील, त्यांनी सीताफळाचे सेवन जरूर करायला हवे. सीताफळ हे शरीराचा दुबळेपणा कमी करणारे आणि पौरुषवर्धक आहे.

सतत थकवा येऊन अंगदुखी सतावत असल्यास सीताफळ खाण्याने लाभ होतो. सीताफळ शरीरातील पेशींना आणि स्नायूंना ताकद देणारे आहे. हे चवीला अतिशय गोड असल्याने या मध्ये कॅलरीजचे प्रमाणही अधिक आहे. सीताफळ आपल्या आहारामध्ये समाविष्ट केल्याने आपल्या शरीरची पचनशक्ती सुधारण्यास मदत मिळते. तसेच पित्ताचा त्रास होत असल्यास सीताफळ खाल्ल्याने फायदा होतो. सीताफळामध्ये लोह आणि क जीवनसत्व मुबलक प्रमाणात असते. सीताफळाची पाने वाटून लावल्यास त्वचेवरील फोड नाहीसे होतात.

केस गळती रोखण्यासाठी सीताफळाच्या बिया बकरीच्या दुधामध्ये उगाळून लावल्यास फायदा होतो. त्याचबरोबर सीताफळामध्ये भरपूर मात्रेमध्ये असणारे अ जीवनसत्व केस, त्वचा आणि डोळ्यांच्या आरोग्याकरिता उत्तम आहे. सीताफळाच्या बिया उगाळून लावावयाच्या झाल्यास बिया लावून डोके एखाद्या जाडसर कपड्याने बांधून टाकावे. या बिया डोळ्यांना लागू देऊ नये कारण त्यामुळे डोळ्यांची आग होण्याचा संभव असतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment