विविध कौशल्य शिका ऑनलाईन


वेब डिझायनर: वेब डिझायनर हा अलिकडच्या काळात विस्तारलेला अभ्यासक्रम मानला जातो. यासाठी कॉलेजला किंवा एखाद्या इन्स्टिट्यूटला जाण्याची गरज भासत नाही. जर आपली टूरीझम कंपनी असेल आणि आपल्याला कंपनीचे ब्रॅंड विकसित करायचे असेल तर संकेतस्थळाच्या माध्यमातून लोकांपर्यंत आपण ब्रॅंड पोचू शकतो. आपल्या कंपनीचे संकेतस्थळ आपण स्वत:च डेव्हलप करू शकतो. त्यासाठी अन्य ठिकाणी दरवाजे ठोठावण्याची गरज नाही. वेब डिझायनचा कोर्स टप्प्याटप्प्याने शिकवला जातो अणि आपणही नियमितपणे त्याचे अवलोकन केल्यास कुशल वेब डिझायनर म्हणून ओळख निर्माण करू शकतो. संकेतस्थळावर दिलेले निर्देश आणि सूचनांचे अचूक पालन केल्यास आपण वेब डिझायनरमध्ये पारंगत होऊ शकतो. कालांतराने आपण अन्य कंपन्यांसाठी वेब डिझायन करू शकतो आणि हा व्यवसाय आपल्यासाठी पार्टटाईम जॉब देखील ठरू शकतो. संकेतस्थळासाठी आवश्‍यक असणारे तंत्र आणि माहिती आत्मसात केल्यास वेब डिझाईनमध्ये नवनवीन प्रयोग सहजपणे करू शकतो.

परकी भाषा : एकापेक्षा अधिक भाषा येणे ही आजच्या काळात गरज बनली आहे. केवळ मातृभाषा अणि इंग्रजी भाषा येणे यावरच आजचे करियर अवलंबून राहिलेले नाही. जर अन्य देशाची, प्रदेशाची भाषा अवगत असेल तर करियरला बुस्ट मिळतो. जर्मन, फ्रेंच, जपानी यासारखी भाषा शिकण्यासाठी विद्यापीठात आणि महाविद्यालयात नियमित अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. मात्र प्रवेश घेण्यासाठी आणि नियमित वर्गाला जाण्यासाठी वेळ मिळेलच याची खात्री देता येत नाही. त्यामुळे ऑनलाइनवर विविध परकी भाषा शिकण्यासाठी संकेतस्थळ उपलब्ध आहेत. वाक्‍यरचना तयार करणे, उच्चार करणे याविषयीचे ज्ञान टप्प्याटप्प्याने दिले जाते. कालांतराने आपण परकी भाषेचे अध्यापनही करू शकतो.

वाद्यांचे शिक्षण: संगीत शाळेत जाण्यासाठी नोकरदार मंडळींना वेळ मिळत नाही. त्याठिकाणी असलेल्या विविध संगीत वाद्यांचे शिक्षण घेण्याची अतूट इच्छा असूनही केवळ आपण मत व्यक्त करत राहतो. मात्र ऑनलाईनमुळे घरबसल्या नवीन कला शिकण्याचे माध्यम उपलब्ध झाले आहे. यूट्यूब, विमीओ आणि व्हिडिओजग यासारखे काही संकेतस्थळ नवीन वाद्यांची माहिती देताना दिसतात. व्हिडिओवर नवीन वाद्यांबाबत ऑनलाइनवर टिप्स मिळतात. गिटार, ड्रम्स आणि व्हायोलिन यासारखे आवडीचे संगीतवाद्यांची माहिती ऑनलाइनवर सहज मिळते. आपल्या सवडीनुसार आणि वेळेनुसार ही वाद्य आपण सहज शिकू शकतो. त्यासाठी वेगळा वेळ द्यायची गरज नाही.

कुकिंग: आजकाल टिव्ही, ऑनलाईन आणि पुस्तकाच्या माध्यमातून कुकिंग क्षेत्राचा व्यापक विस्तार झाला आहे. मान्यवर शेफ आणि डायटिशियनच्या ब्लॉग पोस्टद्वारे नवनवीन इंत्यभूत माहिती आपल्याला मिळते. कोणताही व्यक्ती आज मास्टरशेफ होऊ शकतो किंवा किमान घरात दररोज नवीन डिश तरी बनवायला शिकतो. जगातील कोणत्याही भागाची रेसिपी आपल्याला घरबसल्या शिकायला मिळते. विविध कुकिंग शो आणि ऑनलाईन मार्गदर्शन करणारे शेफ यामुळे आपल्या हाताला चव येऊ शकते. सरावातून एखाद्या चांगल्या पदार्थाची निर्मिती करू शकता.

फोटोग्राफी: फोटोग्राफी तर अनेकांचा आवडता छंद. मोबाईलमुळे फोटोग्राफीला अधिकच उधाण आले आहे. पूर्वी फोटो काढण्यासाठी कॅमेराशिवाय अन्य पर्याय नव्हता. आता मोबाईलक्रांतीमुळे चोवीस तास कॅमेरा आपल्या हातात असल्याने फोटोग्राफीचे क्षेत्र अधिकच विस्तारले आहे. परंतु आपल्याला फोटो काढण्याचे कौशल्य अजूनही अवगत झाले नसेल तर इंटरनेट आपल्या साथीला आहे. बिगिनरपासून ते प्रोफेशनल्स पातळीपर्यंत फोटोग्राफीचे प्रशिक्षण ऑनलाईनवर उपलब्ध आहे. दररोज नव्याने फोटोग्राफीसंदर्भात लेख लिहले जातात आणि त्याचे अवलोकन करून आपण फोटोग्राफीचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण मिळवू शकतो. ऑनलाइनवरही अभ्यासक्रम असून फोटो अपलोड केल्यास आपल्या फोटोग्राफीच्या प्रशिक्षणासंदर्भातील प्रगतीचा आलेख समजतो. फोटोग्राफीच्या तंत्रातही व्यापक बदल झाल्याने डिजिटल तंत्राने फोटोत अधिक अचुकता आणि सुबकता आली आहे. यासंबंधीचे ज्ञान ऑनलाइनवर उपलब्ध आहे.

Leave a Comment