डॉक्टराला दूर ठेवा


जगज्जेता राजा सिकंदर याने आपल्या मृत्युपत्रात आपल्या मरणानंतर आपली शवपेटी घरापासून स्मशानापर्यंत डॉक्टरने ओढत न्यावी अशी इच्छा व्यक्त केली होती. तिचा अर्थ विचारला असता तो म्हणाला, डॉक्टरने कितीही इलाज केला तरीही आपल्याला कधीनाकधी मरावेच लागते. हे लोकांना समजावे म्हणून आपण ही इच्छा व्यक्त केली आहे. याचा अर्थ असा की शेवटी आपले आरोग्य आपल्यालाच सांभाळावे लागते. आयुर्वेदानेही उपचारापेक्षा आहार, विहार आणि विचार यांच्या पथ्यांनी आरोग्य राखावे म्हणजेच शक्यतो आजारी पडण्याची पाळी येणार नाही अशी काळजी घ्यावी असेच म्हटले आहे. म्हणजे आयुर्वेदाचा भर औषधांपेक्षा आरोग्य राखण्यावर अधिक आहे. तारतम्याने विचार केला तरीही आपल्याला हेच जाणवते.

या संबंधात निष्णात डॉक्टर तीन नियम सांगत असतात. निरनिराळ्या आजारांसाठीचे पथ्य वेगळे आहे पण आजारी पडण्याआधी आपण तीन गोष्ट सांभाळाव्यात असे डॉक्टरांचे मत असते. त्यातली पहिली गोष्ट आहे व्यायाम. रोज किमान अर्धा ते एक तास व्यायाम केला पाहिजे. तो कोणता करावा याला काही नियम नाहीत पण शरीराला काही न काही हालचाली मिळाल्या पाहिजेत. व्यायामाचे अनेक प्रकार आहेत. रोज खेळणे, पोहणे किंवा चालणे हे सोपे व्यायाम आहेत. आपल्या दिवसाचे चोवीस तास असतात पण त्यातला एक तासही आपण आपल्यासाठी देत नसू तर आपले आरोग्य चांगले कसे राहील?

दुसरा नियम साधा आहे. आपण सात्विक आहार केला पाहिजे. तो मिताहार असला पाहिजे. भूक लागल्याशिवाय काही खाऊ नये. हे तर नियम आहेतच पण त्या त्या हंगामात मिळणारे एखादे तरी फळ आपण दररोज खाल्ले पाहिजे. ते कोणते असावे याला काही नियम नाही पण फळे खाण्यात विविधता असावी. फळांतून आपल्या शरीराला आवश्यक असलेली जीवनसत्त्चे मिळतात आणि आवश्यक मूलद्रव्येही मिळतात. तिसरा नियम तसा म्हटला तर सोपा आणि म्हटला तर अवघड आहे. हा नियम सांगतो की आनंदी रहा. आनंदी रहाणे हे आपल्या विचारसरणीवर अवलंबून असते. आनंदी राहण्यासाठी जगाकडे आनंदाने पहायला शिकावे लागते. म्हणजे हा नियम आपल्या विचाराशी निगडित आहे. आपल्या आहारात, विहारात आणि विचारात बदल करण्याचा हा एकेक नियम कमालीचा मौलिक असून प्रकृतीच्या अनेक तक्रारी दूर करण्यास कारणीभूत ठरणारा आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment