आपल्या आहारामध्ये अननसाचा समावेश करा


उष्ण हवामान असलेल्या प्रांतांमध्ये अगदी सहज सापडणारे हे फळ म्हणजे अननस. हाडांची मजबूती, त्वचेचा नितळपणा आणि उत्तम पाचनशक्ती या सगळ्यांसाठी अननस अतिशय गुणकारी आहे. अननसामध्ये ब६ आणि क जीवनसत्वे, कॉपर, फोलेट, मँगनीझ, पोटॅशियम, थियामीन, नियासिन इत्यादी पोषक तत्वे आहेत. दररोज एक वाटी भरुन अननसाच्या फोडी खाल्ल्यास आपल्या शरीरातील हाडे मजबूत राहतात. तसेच अननसामध्ये असलेले ब्रोमलेन पचनक्रिया सुधारण्यास हितकारी आहे. अननसामध्ये पोटॅशियम सायट्रेट असते, जे शरीरामधील सोडियमची मात्रा कमी करून उच्चारक्तदाब नियंत्रणात ठेवते.

अननसामध्ये असलेल्या क जीवनसत्वामुळे आपल्या तोंडामधील हिरड्या सुजणे किंवा त्यातून रक्त येणे असल्या विकारांमध्ये फायदा होतो, तसेच शरीरातील रोगप्रतिकारशक्ती ही अननसातील क जीवनसत्वामुळे वाढते. अननसाचा रस घेतल्याने, घसा खराब असल्यास, तो बरा होण्यास मदत मिळते. तसेच सांधेदुखी किंवा ओस्टीओपोरोसीस असणाऱ्यांसाठीही अननस अतिशय लाभकारी आहे. अननासामधील ब्रोमलेन हे कोलन च्या, तसेच प्रोस्टेटच्या कर्करोगापासून वाचविणारे आहे.

अननसामध्ये असणारे अ जीवनसत्व डोळ्यांच्या आरोग्याकरिता अतिशय फायदेकारक आहे. विशेषकरून वाढत्या वयामध्ये दृष्टी कमी होत चालली असेल तर अननस घेतल्याने फायदा होऊ शकतो. अननसामध्ये असलेल्या पोषक द्रव्यांमुळे शरीरामध्ये रक्ताच्या गुठळ्या होत नाहीत. ज्या व्यक्तींना वजन कमी करायचे असेल, त्यांना आहारतज्ञ साखर सोडण्याचा सल्ला देतात. पण तरीही काही व्यक्तींना साखर किंवा गोड खाण्याची अतिशय इच्छा होत असते. अशा वेळी अननसाच्या फोडी खाल्ल्यास गोड खाण्याची प्रबळ इच्छा तृप्त होण्यास मदत होते. त्याशिवाय अननसामध्ये फायबरही मुबलक मात्रेमध्ये असल्याने पचनक्रिया व्यवास्थित राहण्यास मदत होते.

ज्यांना जेवण झाल्यांनतर किंवा अपचनामुळे छातीत जळजळ झाल्यासारखे होते, अश्या व्यक्तींनी अननसाचा रस घ्यावा. मात्र, अननसाचा रस प्रमाणातच घ्यावा. जर हा रस खूप जास्त प्रमाणात घेतला गेला तर पोट बिघडण्याची शक्यता असते. शरीरामध्ये कुठे मुका मार लागला असल्यास किंवा कुठली जुनी जखम बरी होत नसल्यास अननसाच्या सेवनाने फायदा होऊ शकतो. तसेच ज्यांच्या आतड्यांना सूज येत असते, अशांकरिताही अननस उपयोगी आहे.

दह्यामध्ये अननसाचा रस मिसळून ही पेस्ट चेहऱ्यास लावल्यास, त्वचा नितळ होऊन चेहरा उजळण्यास मदत मिळते. चेहऱ्यावर मुरुमांचे डाग किंवा कुठले व्रण असल्यास ते ही या पेस्ट मुळे कमी होऊ शकतात. कधी कधी मांसाहारी स्वयंपाक करताना मटन लवकर शिजत नाही. अशावेळी अननसाचा एक तुकडा मटनामध्ये घालून शिजविल्यास मटन लवकर आणि मऊ शिजते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment