पासपोर्ट- आजच्या काळाचा आवश्यक परवाना

passport

पासपोर्ट म्हणजे पारपत्र. कोणत्याही देशातील नागरिकांना त्यांची ओळख परदेशात पटवून देण्यासाठी तसेच आपला देश सोडून परदेशात प्रवेश करण्यासाठी आवश्यक असलेला महत्त्वाचा परवाना. अर्थात कोणत्याही देशात जाताना केवळ पासपोर्ट असून चालत नाही तर त्यात्या देशाचा प्रवेश परवाना म्हणजे व्हिसाही आवश्यक असतो. मात्र व्हिसा मिळविण्यासाठी अगोदर पासपोर्ट लागतो, म्हणून पासपोर्ट महत्त्वाचा.

आजकाल शिक्षण, पर्यटन, व्यवसाय, मिटींग्ज अशा विविध कारणांनी परदेशात जाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यासाठी पासपोर्ट लागतो.भारतीय परराष्ट्र मंत्रालयातर्फे नागरिकांना हे पासपोर्ट दिले जातात. या पासपोर्टवर तुमची ओळख पटविणारी आवश्यक ती सर्व माहिती असते. पासपोर्ट नक्की कधी काढावा याचा कांही नियम नाही. या ना त्या कारणाने परदेशी जाणारे पासपोर्ट काढतातच.पण ज्यांना परदेशी जाण्याची संधी मिळेल की नाही हे माहिती नसते, त्यांनी लक्षात घ्यावे की शक्यतो पासपोर्ट वेळीच काढून घेणे उपयुक्त ठरते.

याचे मुख्य कारण म्हणजे पासपोर्ट मागितला की लगेच मिळाला असे कधीच होत नाही. त्यासाठी बरीच कागदपत्रांची पूर्तता करावी लागते तसेच ही कागदपत्रे पासपोर्ट कार्यालयाकडून तपासली गेली की त्याची सत्यता पडताळून पाहण्यासाठी पोलिस घरी येऊन अथवा आपल्याला पोलिस स्टेशनमध्ये बोलावून या कागदपत्रांची सत्यता तपासतात तसेच तुमच्यावर भारतीय दंड विधानानुसार कोणता गुन्हा वगैरे दाखल नसल्याचे प्रमाणपत्र पासपोर्ट कार्यालयाकडे पाठवितात व मगच पासपोर्ट इश्यू होत असतो.

याबाबत प्रथम पासपोर्ट कार्यालयाकडे त्यांच्या विहित नमुन्यात अर्ज करावा लागतो. आज ऑनलाईनवर हे अर्ज भरता येतात. पासपोर्ट काढण्यासाठी ठरविलेली फीही कार्यालयाकडे जमा करावी लागते. नियमानुसार सर्व कागदपत्रे (सुरवातीला झेरॉक्स कागदपत्रे) आणि फोटो (साधारणपणे आठ फोटो- पासपोर्टसाईजचे) द्यावे लागतात. कागदपत्रे दाखल करून घेतल्यानंतर साधारण दोन महिन्यांच्या काळात पासपोर्ट मिळतो. पासपोर्ट पोस्टाने पाठविले जातात आणि संबंधित व्यक्तीच्याच हातात ते दिले जातात. घरातील अन्य व्यक्तीला तुमचा पासपोर्ट दिला जात नाही हे लक्षात ठेवावे.

ज्यांनी आधार कार्ड काढले आहे, त्यांना पासपोर्टसाठी कमी कागदपत्रे द्यावी लागतात तर ज्यांना आधार कार्ड काढायचे आहे, त्यांच्याकडे  अगोदरच पासपोर्ट काढला असेल तर फक्त पासपोर्ट दाखविला की आधारकार्डासाठीची अन्य कागदपत्रे दाखवावी लागत नाहीत असा या दोन्ही महत्त्वाच्या परवान्यांचा संबंध आहे.

Leave a Comment