व्यावसायिक नेटवर्किंग

network

व्यावसायिक नेटवर्किंगच्या माध्यमातुन अनेक उद्योजक  विश्वासाने एकमेकांशी जोडले  जातात. ते एकमेकांची चालतीबोलती जाहिरातही बनतात. जुन्याजाणत्या  किंवा नवख्या उद्योजकांना  हे माध्यम गुंतवणूकदार, सल्लागार आणि महत्वपुर्ण उमेदवारही मिळवुन देते. त्यामुळे असे नेटवर्क असणे हे यशाचे अनिवार्य कौशल्य समजले जाते. यातुन उद्योजक, व्यावसायिक संघटना, ग्राहक, पुरवठादार आणि सल्लागार यांच्यात परस्परसंबंधांचे सेतू बांधले जातात. त्यामुळेच जाहिरात आणि जनसंपर्कापेक्षाही याला अधिक महत्व प्राप्त झाले आहे. सामाजिक नेटवर्किंगप्रमाणेच यातही काही शिष्टाचारांचे पालन करावे लागते. काही नियम काटेकोरपणे पाळल्यास अशा संपर्काचे कौशल्य आणि व्याप्ती वाढवता येते.  

प्राधान्याने करावयाच्या गोष्टी :

  • स्थानिक व्यावसायिक गटात सामील व्हा : स्थानिक व्यावसायिक गटात सामील होऊन आणि त्यांच्या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतल्यास या प्रक्रियेची सुरुवात होते. शहरांमध्ये अनेक ठिकाणी अशा गटांची स्थापना होऊन त्यांना लोकप्रियताही मिळत आहे. भिन्नभिन्न पार्श्वभूमीचे लोक येथे एकत्र येत असल्याने व्यवसायवृद्धीसाठी ते एकमेकांना मदत करू शकतात. तुमच्या उद्दिष्टाला अनुसरून अचुक गटाची निवड करणे मात्र महत्वाचे आहे. या गटांच्या चर्चांमधुन व्यावसायिक संबंध कसे निर्माण करावेत व त्यांना अधिक मजबुती कशी द्यावी याचे प्रत्यक्ष शिक्षण मिळते.
  • शंकांचे निरसन करा : चर्चेस मार्ग करून देणारे, संभाषण खुलविणारे प्रश्न विचारताना अजिबात संकोच करू नका. इतरांची सविस्तर चौकशी करून तुम्हाला त्यांच्यात रुची असल्याचे दाखवा.
  • स्वतःचे उत्तम सादरीकरण  : तुम्ही शक्तिशाली संसाधन असल्याचे गटातील इतर सदस्यांना पटवुन द्या. यामुळे ते सूचना, विचारविमर्श आणि संपर्कासाठी तुमच्याकडे येण्याची शक्यता वाढते. लक्षात ठेवा, उत्तम सादरीकरणामुळेच नेटवर्किंगच्या अवकाशात तुम्हाला महत्वपुर्ण स्थान लाभु शकते.
  • संधीचा योग्य फायदा घ्या : तुम्हाला नेमके काय हवे आहे आणि ते मिळवण्यासाठी इतर लोक तुम्हाला कशी मदत करू शकतात हे अनौपचारिक भेटीतुनही व्यक्त करा.
  • योग्य व्यक्तीच्या संपर्कात रहा : तुम्हाला उपयोगी पडू शकणाऱ्या लोकांपर्यंत तुम्ही पोहोचणे महत्वाचे आहे. त्यांना भेटून तुम्हाला होत असलेला आनंद व्यक्त करा आणि त्यांना शक्य ती मदत करा. परस्परांना भेटून एकमेकांचे भविष्यकालीन विचार जाणून घ्या. येथे कल्पनांच्या देवाणघेवाणीला महत्व आहे.
  • प्रशंसा करा : गटातील एखाद्याने मदतीचा हात पुढे केल्यास तुम्हीही त्याला अवश्य मदत करा. केलेल्या मदतीबद्दल त्याचे आभार मानायला विसरू नका. मदत करणाऱ्याला दाद देण्यासाठी एखादे भेटकार्ड किंवा ई-मेलही पुरेशी ठरू शकते. दीर्घ काळ टिकणारे व्यावसायिक नातेसंबंध यातुनच फुलतात.

कटाक्षाने टाळायच्या गोष्टी

  • व्यावसायिक गटाच्या बाह्य आकारमानावरून त्याची निवड करू नका : अनेक लहान-मोठ्या स्तरावर व्यावसायिक गट आढळतात. आधुनिक जगाच्या व्यवहारांशी नाते जोडण्यासाठी दर्जेदार संपर्क यंत्रणेची आवश्यकता असल्याने असा संपर्क देऊ शकणाऱ्या गटांची निवड तुमच्यासाठी करा.
  • संभाषणापूर्वी इतरांना तुमचे व्यावसायिक कार्ड दाखवु नका : इतरांना आधी जाणुन घ्या, त्यांची ओळख करून घ्या आणि मगच त्यांना तुमचे कार्ड दाखवा.
  • अनावश्यक मते व्यक्त करू नका : अनावश्यक मते, निरीक्षणे व्यक्त करून स्वतःवर विचित्र परिस्थिती ओढवुन घेऊ नका. तुम्हाला मत विचारले गेल्यास शक्यतो तटस्थ उत्तरे देण्याचा प्रयत्न करा. 
  • तात्काळ परिणामांची अपेक्षा बाळगू नका : व्यावसायिक नेटवर्किंग माणसांचा वापर करून घेण्यासाठी नसून सामुदायीकरित्या फायदेशीर नातेसंबंध प्रस्थापित करण्यासाठी आहे हे लक्षात घ्या. येथे तुम्ही अनेकविध हितसंबंधी लोकांना भेटता, एकमेकांना मदत करता आणि दृढ, टिकाऊ नातेसंबंध स्थापन करता. एकांगी लाभ हा अशा नेटवर्किंगचा उद्देश नसतो. ‘मला यातुन काय मिळेल’ या दृष्टीने त्याकडे पहाल तर  तुमच्या पदरी निराशाच येईल. त्यामुळे परस्परांना जाणुन घेईपर्यंत संयम बाळगा.  
  • सातत्याने संपर्कात रहा : व्यावसायिक गटांशी संपर्क ठेवण्यात कमी पडल्यास अनेक व्यावसायिक संधी तुमच्या हातुन निसटतील. फोन आणि ई-मेल यांच्यामार्फतही तुम्ही लोकांच्या संपर्कात राहू शकता.

ऑनलाईन आणि व्यक्तिगत व्यावसायिक नेटवर्किंग

संपर्कवर्तुळ  वाढविण्यासाठी सोशल नेटवर्किंगचा वापर करण्याचे प्रमाण उद्योजकांमध्ये वाढते आहे. यामुळे त्यांना  भक्कम आधार देणाऱ्या व्यावसायिक भागीदारांच्या संख्येतही  भरघोस वाढ होते. अनेकांचे व्यवसाय आंतरराष्ट्रीय स्तरावरून वाढत असल्याने अशा सोशल नेटवर्कच्या माध्यमातुन एकमेकांशी संवाद साधणे आज व्यावसायिकांसाठी सुलभ झाले आहे. काही विशिष्ट ई-कॉमर्स प्लेटफॉर्म आणि बिझनेस पार्टनरशिप नेटवर्कमुळे जगभरातील अधिकारी खुपच जवळ आले आहेत. भारतात मात्र प्रत्यक्ष  भेटीतुन संवाद साधण्यालाच अधिक महत्व आहे. व्यावसायिक गट वेगवेगळे समारंभ, प्रसंग साजरे करून अशा संवादाची गरज भागवताना दिसतात. यावरून आपण म्हणु शकतो की व्यावसायिक नेटवर्किंग हे आजच्या उद्योजकांच्या व्यवसायाचाच एक घटक बनले आहे. यातुन खुल्या होणाऱ्या संधींमुळे व्यावसायिक नातेसंबंधात आणि पर्यायाने व्यवसायातही काही काळानंतर चांगलीच वाढ होते.

Leave a Comment