विसाव्या शतकात माणसाने प्रथमच झोप या विषयावर गांभिर्यानें विचार करणयास सुरुवात केली.त्यापूर्वी तशी कधी गरजच भासली नव्हती.माणसाने विविध क्षेत्रात प्रगती केली खरी पण झोप गमावून बसला.जगातील अनेक गोष्टीवर त्याने ताबा मिळवला पण झोपवर काही ताबा मिळवता आला नाही. एकविसाव्या शतकात जगातील प्रमुख समस्येच्या विषयात या विषयाचा समावेश झाला आहे.गेले संपूर्ण शतकभर माणसाच्या झोपेच्या समस्या या विषयाने मनोवैज्ञानिक आणि शरीर वैज्ञानिक यांची अक्षरशः झोप अुडवली आहे.शांत झोप कशी घ्यावी ,याबाबत पंधरा पंधरा तास शांत झोपणारे निसर्गातील अन्य प्राण्यांच्या शरीरातील पेशींचा वापर करून माणसाला काही शिकता येआील का,या दिशेने सध्या मानवाचा शोध सुरु आहे.
माणसाच्या चिंतनाचा आणि चिंतेचा गंभीर विषय।।झोप।।
ज्या वेळी एकेकाळच्या चतुष्पाद माकडाने आपले पुढचे दोन पाय अुचलून त्याचे हातात रुपांतर करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्याच्या शरीराच्या दृष्टीने दोन महत्वाच्या घटना घडल्या.एक म्हणजे त्याच्या मेंदूला चालना मिळून त्याचे झोपेचे प्रमाण घटले आणि दुसरे म्हणजे त्याची पाठ दुखू लागली.झोप आणि पाठीच्या मणक्याचे विकार या मानवाच्या फार जुन्या समस्या आहेत.विसाव्या शतकाने एकविसाव्या शतकाला दिलेल्या दोन समस्या म्हणजे पाठ दुखी आणि झोपेची समस्या.पंधराव्या शतकात युरोपमध्ये प्रथम या समस्येचे त्रासदायक स्वरूप हळूहळू लक्षात येउ लागले.
तांब्याच्या भांड्यातील पदार्थ खाताना घ्या काळजी
औद्योगिकरणाने आता ती सार्या जगाची समस्या झाली आहे.औद्योगिकरणामुळे सामान्य माणसाचे जीवन जसे धकाधकीचे होत चालले आहे, तसे स्वास्थ मिळवण्यासाठी नवे नवे मार्ग शोधण्याकडे माणसाची प्रवृत्ती झाली आहे. माणसाची झोप हा सध्या जगातील शास्त्रज्ञांपुढे अभ्यासाचा विषय आहे. मानवाला दिवसाच्या २४ तासापैकी एक तृतियांश काळ झोप लागते. पण अनेक प्राणी हा झोपेचा काळा आपल्या गरजेनुसार निश्चित करतात.
जिराफची मान लांब का आणि बेडकाला बिचार्याला मानच का नसते, या सार्या बाबी गरजेनुसार ठरतात व उत्क्रांतीच्या तत्वानुसार आत्मसात होतात.माणसाच्या झोपेवर पतंजली ऋषींच्या योगसूत्रात सखोल विचार केला आहे.वैदिक वाङमयात आलेले निद्रासूक्त याचा आजपर्यंत त्याचा वापर करणारांना हमखास उपयोग झाला आहे.आयुर्वेदाच्या अभ्यासकांनी त्यावर चांगले चांगले मार्ग शोधून काढले आहेत.तरीही झोपेच्या कारणांचे गूढ प्राण्यांच्या निरीक्षणातून अजून नाही गूढे कळतील,अशी शास्त्रज्ञाना आशा आहे.
आपल्या भोवतालचे काही प्राणी दिवसातून अवघी दोन तास झोप घेतात तर काही प्राणी २२ तास झोप घेतात. या झोपेचा अभ्यास सध्या शास्त्र अशा कारणासाठी करत आहेत, की प्राण्यांच्या या वैश्यिष्ट्याचा मानवाला उपयोग होईल.
यापूर्वी रक्त या विषयाबाबतचे प्राण्यांवरचे संशोधन मानवाला अतिशय उपयुक्त पडले आहे. डुकराच्या कमरेचे हाड आणि मानवाच्या प्रसुतीच्या वेळी उपलब्ध होणारे काही स्त्राव या दोनी बाबींनी मानवाच्या रक्त पुरवठा क्षेत्रात एक मोठी क्रांती केली आहे. डुकराच्या कंबरेच्या हाडात माणसाला लागणारे रक्त तयार करण्याचे सामर्थ्य आहे. उद्या कोठे अणुयुद्ध झाल्यास किरणोत्सर्गाचा त्रास झालेल्यांना वाचवण्यासाठी डुकराने तयार केलेले ताजे रक्त उपयोगी पडणार आहे. त्याखेरीज प्रत्येक व्यक्तिलाच आपले रक्त हे रक्तदान करुन साठवून ते किरणोत्सर्गापासून वाचवण्यासाठी पृथ्वीच्या खोलवर ठेवता येईल, अशा आपापले रक्त साठवणार्या ‘सेफ ब्लेड डिपॉझिट हॉल्ट बँका’ आता अमेरिकेसारख्या देशात तयार झाल्या आहेत.
रक्तावर संशोधनाला पाहिल्या आणि दुसर्या महायुद्धामुळे प्रचंड चालना मिळाली. त्याप्रमाणे झोप या विषयाला औद्योगिकरणामुळे चालना मिळाली. एखाद्या प्राण्याचा गुण आत्मसात करायचा असेल तर त्या प्राण्याचे दुध वापरण्याची पद्धत आयुर्वेदात आहे. पण गेली १०० वर्षे त्या प्राण्याचे मांस काढण्याची पद्धत वापरली गेली आहे. विज्ञानाची घोडदौड आता जनुक शास्त्राच्या दिशेने निघाली आहे. पुढील किमान १०० वर्षे ही जनुक शास्त्राची असतील, असे आज मानले जाते. निसर्गातील कोणत्या प्राण्याचा कोणता स्वभाव मानवात संक्रमित करता येईल, यासाठी हे शास्त्र मार्गदर्शक ठरणार आहे.
आज जगात जेवढे प्राणी आहेत त्या सर्व प्रकारख्या प्राण्यांच्या झोपेबद्दल विचार केला तर त्या प्राण्यांचा आहार-विहार, सवयीनुसारच त्यांच्या झोपेचा कालावधी असतो असे सिद्ध झाले आहे. प्राणीमात्रांमध्ये झोपेच्या दृष्टीकोनातून विचार केला तर त्यांचे सर्वसाधारणपणे ८ गट पडतात असे आढळते. शाकाहारी प्राणी, श्वापदांकडून भय असणारे, झाडांवर वास्तव्य असलेले, विशालकाय प्राणी, अतिलहान मार्जार जातीतील प्राणी, अश्वजातीतील प्राणी आणि द्विपाद असे हे ढोबळ गट आहेत.
शाहाकारी प्राण्यांच्या झोपेचा कालावधी साधारणपणे ७ तासापासून ११ तासांइतका असतो. तर श्वापदांपासून भय असणार्या प्राण्यांची झोप अतिशय कमी म्हणजे २ ते ४ तास इतकीच असते. शेळ्या, मेंढ्या, बकरे यांची झोप ४ तास तर हरिण, गाढव यांची पाच तास. जराफ , गायी यांनाही ४ तासाची झोप पुरेशी असते तर मांजर १५ तास झोपते.
चिपाझी, गोरिला व इतर जातीची माकडे, बबून माकडे यांच्या झोपेचा कालावधी १० ते १७ तासांच्या दरम्यान आहे. तर मांजर, चित्ता, सिह, वाघ, लांडगा या मार्जार जातीतील प्राण्यांची झोप १३ ते १५ तासांदरम्यान आहे. याउलट घोडा,झेब्रा, अफिकन हत्ती, आशियाई हत्ती यांची झोप केवळ ३ तासाची आहे.
कोआला आणि दोन पंजाचे एक प्रकारचे वानर यांची झोप सर्वाधिक आहे. म्हणजे अनुक्रमे २२ व २० तास एवढी आहे. जमिनीवर, बिळात राहणारे उंदीर, घुशी, खारी असे प्राणी १३ ते १४ तास झोपेत घालवतात. असे निरीक्षणाअंती सिद्ध झाले आहे. प्राण्यांच्या झोपेबाबतही शरीराचे तापमान, हृदयाची स्पंदने,रक्तदाब याबाबीही महत्वाची भूमिका बजावतात. विशेष म्हणजे मानवाच्या झोपेबाबतही ह्या गोष्टी अतिशय महत्वाच्या ठरत असतात. एवढेच नव्हे तर दिवसभरात या लक्षणांमध्ये होणारे बदलही बहुधा ठराविक क्रमानेच होत असतात. उदाहरणार्थ मानवाच्या शरीराचे तापमान जेव्हा सर्वाधिक असते तेव्हा तो दिवसभरातील अधिक कार्यक्षत असतो तर जेव्हा शरिराचे तापमान सर्वात कमी असते, तेव्हा तो आळसावलेला असतो आणि हाच काळ सर्व प्राण्यांमध्ये झोपेचा काळ असतो.
झोप म्हणजे जागे नसणे, एवढाच अर्थ नाही तर ती एक प्रदीर्घ, अनेक घडामोडी असलेली प्रक्रिया आहे. झोपेवर सध्या जगभर चालू असलेल्या संशोधनातून झोपेचेही काही प्रकार अथवा स्टेजेस असतात हे सिद्ध झाले आहे. ईईजी च्या सहाय्याने शास्त्रज्ञ मेंदूकडून होणार्या क्रिया नोंदवू शकतात. त्यानुसार प्राण्यांच्या जागृतावस्थेच्या काळात व झोपेच्या काळात मेंदूकड वेगवेगळे कार्य होत असते, असेही लक्षात येते.
झोपेचे ढोबळमानाने दोन प्रकार पडतात. डोळ्यांची हालचाल कमी करणारी व डोळ्यांची हालचाल अधिक असणारी. दुसर्या प्रकारात पापण्या मिटल्या असल्या तरी बुबुळांची हालचाल जोरात होत असते व जेव्हा अशा झोपेतून माणूस जागा होतो तेव्हा तो स्वप्न पडल्याचे सांगतो, असेही आढळून आले आहे.
रात्रीची झोप यातही गाढ झोपेचा आणि अर्धवट जागृतावस्थेतील झपेचा कालावधी हा आलटून पालटून रात्रभर चालू असतो. कोणताच प्राणी पूर्ण रात्र गाढ झोपेत नसतो तसेच पूर्ण जागृतावस्थेतही नसतो. गाढ झोपेचा पहिला टप्पा सर्वसाधारणपणे ९० मिनिटांचा असतो. त्यानंतर स्वप्नावस्थेतील झोपेचा कालावधी असतो. याकाळात माणसाचा मेंदू कार्यरत असला तरी शरिराचे बाकी अवयव रिलॅक्स स्टेजमध्ये असतात. स्वप्नावस्था अथवा रेमचा कालावधी बहुधा ५ ते १० मिनिटांचाच असतो व त्यानंर पुन्हा झोपेचा दुसरा टप्पा सुरु होतो असे संशोधनातून सिद्ध झाले आहे.
स्वप्नावस्थेच्या या छोट्या टप्यात काही विशिष्ट रासायनिक बदल व हार्मोन्स प्राण्यांच्या शरिरात होत असतात. रक्तातील काही हार्मोन्सची पातळी याकाळात कमी होते त्यामुळे वेगवेगळ्या प्रक्रिया शरिरात घडत राहतात. मेंदूचे तापमान वाढते व श्वसनाचा वेगही वाढतो. मेंदूत तयार होणार्या सेरोटोनिन या द्रव्याची पातळीही याकाळात वाढते असेही आढळून आले आहे.
अर्थात झोप ही सर्व प्राणीमात्रांसाठी आवश्यक प्रक्रिया असली तरी कोणी किती झोपावे याला मात्र नक्की नियम लावता येत नाही. प्रत्येक प्राण्याच्या मानवाच्या शरीर गुणधर्माप्रमाणे झोपेचा कालावधी वेगवेगळा असतो. पण वय वाढेल तसे झोपेचे प्रमाण कमी होत जाते हे मात्र नक्की. मध्यमवयाची माणसे सर्वसाधारणपणे ७-८ तास झोपतात तर बालकात झोपेच तास १० ते १२ तास तर अर्भकावस्थेत हा कालावधी २०-२२ तासांचा असतो. त्या मानाने प्रौढ आणि वृद्धावस्थेत झोपेचा कालावधी ३ ते ५ तासांदरम्यान येतो. हा सर्वसाधारण अनुभव आहे. अर्थात हा कालावधी प्रयत्नपूर्वक कमी जास्त करणे शक्य असल्याचेही पहायला मिळते. तसेच आठवड्यापर्यंत
एखाद्याला झोप अजिबात मिळाली नाही तर त्याच्या शरिरावर फारसा वाईट परिणाम होत नाही असेही संशोधनात आढळून आले आहे.
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला आयुष्यातील काही काळ तरी निद्रानाशाचा त्रास हातो. काहीजणांच्या बाबतीत हा त्रास न राहता विकारच बनतो. त्यामागे जीवनातील धकाधकी, खाण्यापिण्याच्या वेळातील बदल, कामाचा ताण, वेगवेगळी टेन्शन्स ही प्रमुख कारणे असतात. म्हणूनच झोपेसाठी औषधे, गोळ्या डॉक्टर्स देतात. आजकाल अशा औषधांचा खपही प्रचंड प्रमाणात वाढत आहे.
या सर्वांवर मात करायची असेल आणि माणसाचे आयुष्य सुखी बनवायचे असेल तर झोप व्यवस्थित लागावी व ती औषधाविना लागावी यासाठी सध्या प्रचंड संशोधन जगभर चालू आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्राण्यांची झोप,त्यांच्या शरिरातील कोणत्या घटकाचा,द्रव्याचा झोपेवर परिणाम होतो व हे सारे मानवाच्या बाबतीत घडवणे शक्य आहे का यासाठी संशोधक अथक परिश्रम करत आहेत. प्राण्यांची जनुके यासाठी कितपत उपयोगी पडतील याचेही प्रयोग सध्या चालू आहेत.
औद्योगिकरणामुळे गेली काही शतके झोप हा सगळ्याच मानव जातीचा चितेचा विषय होत गेला असला तरी मानवाला शांत झोप कशी येईल,ही चिता अगदी वैदिक काळापासून होती.माणसाला झोप कशी लागते ,यावर त्याची अध्यात्मिक प्रगती अवलंबू आहे.योगाभ्यास करणारी व्यक्ती पतंजलींच्या अष्टांग योगाच्या मार्गातून प्रवास करत असते.अष्टांग योगाच्या मार्गाने होणारी योगी व्यक्तीची वाटचाल ही एक अध्यात्मिक तीर्थयात्राच असते आणि त्या तीर्थ यात्रेच्या प्रत्येक मुक्कामावर झोपेच्या ताळेबंदाचा हिशोब द्यावा लागतो.
वेद आणि अुपनिषदे यांनी झोप या विषयाचे अतिशय चांगले वर्णन केले आहे.छांदोग्य आणि बृहदारण्यकोपनिषद यामध्ये झोपेचे अध्यात्मिक स्थान सांगितले आहे.हृदयापासून पुरीतत नाडीपर्यत बाहत्तर हजार सूक्ष्म रक्तवाहिन्या आहेत.आत्म्याचा प्रवास पुरीतत नाडीपर्यंत झाला की,गाढनिद्रा सुरु होते.झोपेवर नियंत्रण मिळवण्याचा सर्वात राजमार्ग म्हणजे ‘शवासनाचा ’अभ्यास करणे असे योगाभ्यासी मंडळींचे म्हणणे आहे.सूर्यनमस्काराने जसे शरीर प्रमाणित होते त्याप्रमाणे शवासनाने झोप प्रमाणित होते.जागरण,तणाव,आहाराची आबाळ,गैरसोयीचा किवा उभ्याने प्रवास या सर्व समस्यावर पहाटे जागे असणे आणि शवासन हा रामबाण उपाय सांगितला आहे.पण शवासन आत्मसात करण्याच्या प्रयत्नात झोप उडणे शक्य आहे.शवासन आत्मसात कसे करायचे हा स्वतंत्र विषय आहे.निद्रासूक्ताचा चांगला परिणाम झाल्याची संख्या फार मोठी आहे.‘या दवी सर्व भूतेषु निद्रारूपेण संस्थिता नमस्तस्यै नमतस्यै नमतस्यै नमो नम ,’ ।।’याचा वापर करून बघण्यासारखा आहे.मंत्रावर विश्वास आहे की नाही हा निराळा विषय आहे.पण या ंमंत्राचा उपयोग ंमंत्रतंत्र प्रकरणावर विश्वास नसणारांनाही झाला आहे.कदाचित ते शब्द वारंवार घोटल्यामुळे आपोआपच झाला असेल पण त्याचा अुपयोग झालेल्यांची संख्या मठी आहे.ज्याना प्रतिभायुक्त आणि धकाधकीचे काम करायचे आहे,त्यांनाही वरील उपाय उपयोगी आहेत.असे असले तरी प्राण्यापासून झोपेबाबत काही नवीन झोपेबाबतची काही गुपिते मिळतात का,याकडे शास्त्रज्ञांचे लक्ष लागून राहिले आहे……….
…..मोरेश्वर जोशी,पुणे
very nice and informative article.very good website for marathi news