तुम्हाला उत्कटपणे काय खावेसे वाटते?

काहीजणांना विशिष्ट चवीबद्दल फारच आकर्षण असते. यामागील कारणांचा शोध बरेच शास्त्रज्ञ घेत आहेत. अशाच काही चवींबद्दलचे हे संशोधन

*खारट पदार्थ : तुम्हाला सतत कुरकुरीत खारे पदार्थ खावेसे वाटत असतील तर याचा अर्थ तुमच्या शरीरात खनिजांची कमतरता आहे. आहारातुन कमी कैल्शियम घेणाऱ्यांना सतत खारे पदार्थ खावेसे वाटतात. मिठातील सोडीयममुळे रक्तातील कैल्शियमची पातळी तात्पुरती वाढते आणि कैल्शियमची उणीव भरून निघाल्यासारखी वाटते. चरबीचा अंश कमी असणारे कॉटेजचीज आणि समुद्री मासे यांचा आहारात समावेश करणे हा यावरील नामी उपाय आहे. या पदार्थांमुळे हाडे बळकट होण्यासही मदत होते.
   
*मसालेदार पदार्थ : शरीराला थंडावा मिळावा यासाठी सतत चटकदार पदार्थ खावेसे वाटतात. असे मसालेदार पदार्थ खाल्ल्याने अंगभर घाम फुटतो आणि शरीराचे तपमान कमी होते. मात्र असे अधिक उष्मांक देणारे चमचमीत पदार्थ खाल्ल्याने वजन वाढण्याचा धोकाही वाढतो. त्याऐवजी भाजलेले, शेलो फ्राय केलेले पदार्थ खावेत, म्हणजे झणझणीत खाल्ल्याचे समाधानही मिळते आणि वजनही वाढत नाही. उष्ण कटिबंधीय देशांमध्ये मसालेदार पदार्थांचे ठेले जागोजागी का आढळतात याचे कारणही आता तुमच्या लक्षात आले असेल.
   
*गोड पदार्थ : चॉकलेटसारख्या गोड पदार्थांमुळे मानसिक नैराश्य काही प्रमाणात कमी होते. यामुळे मुडही काहीसा सुधारल्यासारखा होतो. शरीरातील उर्जेची पातळीही वाढते. याचे कारण म्हणजे गोड पदार्थातील साखर शरीरात झटकन शोषली जाते. यावरील उपाय म्हणजे आहारात पिष्टमय पदार्थांचे प्रमाण वाढवणे. यामुळे शरीरात उर्जेची उच्च पातळी अधिक काळ टिकुन राहते. भाजलेले बटाटे किंवा होलमील टोस्ट हे या दृष्टीने उत्तम खाद्यपदार्थ! हे पदार्थ खाल्ल्यानंतर व्यायाम करायला मात्र विसरू नका…

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment