अक्षय कुमारचा ‘राम सेतू’ हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच वादात सापडला आहे. भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुब्रमण्यम स्वामी यांनी अक्षय कुमारच्या विरोधात आघाडी उघडली असून खटला भरण्याची तयारी केली आहे. ‘राम सेतू’ चित्रपटात तथ्यांशी छेडछाड करण्यात आली असून दिशाभूल करणारी माहिती देण्यात आल्याचे स्वामी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यांचे सहकारी वकील सत्या सभरवाल अक्षय कुमार आणि चित्रपटाची निर्माता कंपनी कर्मा मीडिया यांच्याविरुद्ध नुकसान भरपाईसाठी दावा दाखल करणार आहेत. त्यासंदर्भातील सर्व कागदपत्रे तयार केली आहेत.
अक्षय कुमारच्या ‘राम सेतू’ चित्रपटावरून वाद, सुब्रमण्यम स्वामी खटला दाखल करण्याच्या तयारीत, म्हणाले- परदेशी नागरिक असेल, तर करू अटकेची मागणी
आणखी एका ट्विटमध्ये स्वामींनी अक्षय कुमारच्या नागरिकत्वाचा मुद्दाही उपस्थित केला आहे. त्यांनी लिहिले की, अभिनेता अक्षय कुमार परदेशी नागरिक असेल, तर आम्ही त्याच्या अटकेची मागणी करू. यासोबतच त्यांना भारतातून बाहेर काढून, ज्या देशात नागरिकत्व घेतले आहे तेथे पाठवण्यास सांगितले जाईल. अक्षय कुमारच्या नागरिकत्वावर प्रश्न उपस्थित होण्याची ही पहिलीच वेळ नाही.
अक्षय कुमारच्या नागरिकत्वावरून यापूर्वीही अनेकदा वाद झाले आहेत. मात्र, एका मुलाखतीत कॅनडाच्या नागरिकत्वावर स्पष्टीकरण देताना त्याने सांगितले की, जेव्हा त्याचे चित्रपट चालले नाहीत, तेव्हा तो कॅनडाला गेला होता. चित्रपट चालल्यानंतर तो परत आला. तो म्हणाले होता की, मी मनाने भारतीय आहे, फक्त पासपोर्टने काहीही बदलत नाही.
चित्रपटाच्या कोणत्या भागावरून वाद?
सुब्रमण्यम स्वामींच्या ट्विटनंतर अधिवक्ता सत्य सभरवाल यांनीही ट्विट करून चित्रपटाचा कोणता भाग आक्षेपार्ह आहे, हे सांगितले. त्यांनी लिहिले की, ‘राम सेतू’वर आधारित चित्रपटात डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल पोस्टर म्हणून वापरण्यात आला आहे. खोटे तथ्य आणि फेरफार करून दाखवले. सभरवाल यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रतही शेअर केली आहे.
ट्विटर वापरकर्त्यांची प्रतिक्रिया:
सुब्रमण्यम स्वामींच्या ट्विटवर युजर्स त्यांच्या प्रतिक्रियाही देत आहेत. शांतीनाथ चौधरी नावाच्या युजरने विचारले की, जर त्याच्याकडे (अक्षय कुमार) भारतीय नागरिकत्व नाही, तर तो इतके दिवस भारतात कसा राहतो? कोणता नियम किंवा व्हिसा त्याला हे करण्यास परवानगी देतो, कोणी सांगू शकेल का?.
विकास ठाकूर नावाच्या युजरने स्वामींची खिल्ली उडवली आणि लिहिले, किती बेताल विचार आहेत. त्यानुसार ज्या भारतीयाने दुसऱ्या देशाचे नागरिकत्व घेतले आहे, त्याला भारतात येण्याचा अधिकार नाही….अमोल सेनने लिहिले की, अक्षय कुमार तुमच्यापेक्षा जास्त कर भरतो, अशा वादात काय अर्थ आहे.