मुंबई : महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि शिवसेनेचे उपनेते अर्जुन खोतकर 31 जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटात सामील होणार असल्याचा दावा शिवसेनेच्या एका बंडखोर आमदाराने शुक्रवारी केला. माजी मंत्री आणि औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी पीटीआयशी बोलताना हा दावा केला आहे.
अर्जुन खोतकर यांची उद्धव ठाकरेंनी नुकतीच केली होती शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती, आता दाखल होणार एकनाथ शिंदे गटात
खोतकर हे मूळचे जालना जिल्ह्यातील आहेत. 2014 ते 2019 या काळात ते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये मंत्रीही होते. त्यांना नुकतीच पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या उपनेतेपदी बढती दिली.
सत्तार म्हणाले, खोतकर सुरुवातीला बंडखोर छावणीत सामील होण्याबाबत संभ्रमात होते, पण मी त्यांचा संभ्रम दूर केला. आता ते सिल्लोड येथे 31 जुलै रोजी एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होणार आहेत. त्यांच्यासोबत स्थानिक बाजार समितीचे सदस्य, माजी नगरसेवकही असतील.
लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या विरोधात खोतकर यांना रिंगणात उतरवण्याच्या यापूर्वीच्या विधानाबाबत विचारले असता सत्तार म्हणाले, जालना लोकसभा मतदारसंघावर आमचा दावा अजूनही कायम आहे. मात्र दानवे आणि त्यांच्या पक्षातील इतर सदस्यांना पराभव पत्करावा लागला आहे. राज्यातील राजकीय परिस्थिती आता बदलली आहे.