युएई, कतार मध्ये पावसाचा धुमाकूळ

जगातला सर्वात मोठा वाळवंटी भाग सध्या मुसळधार पावसाच्या तडाख्यात सापडला आहे.गेल्या २७ वर्षांचे रेकॉर्ड या पावसाने मोडले आहे.  युएई आणि कतार येथे होत असलेल्या प्रचंड पावसाने अनेक घराचे नुकसान झाले आहेच पण रस्ते आणि वाहने पाण्यात बुडाली आहेत. यामुळे घरांचे नुकसान झालेल्या अनेक नागरिकांना हॉटेल मध्ये आश्रय घ्यावा लागत असल्याचे समजते. युएईच्या पूर्व भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक वाहने वाहून गेली आहेत. खलीज टाईम्सच्या बातमीनुसार युएईच्या हवामान विभागाने हवामान धोकादायक बनल्यामुळे रेड अॅलर्ट जारी केला असून नागरिकांनी घराबाहेर पडू नये आणि कार्यालयीन काम घरातूनच करावे असे आदेश दिले आहेत.

सोशल मिडीयावर या तुफानी पावसाचे आणि त्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचे अनेक फोटो आणि व्हीडीओ व्हायरल झाले आहेत. संपूर्ण दिवस कोसळलेल्या या पावसाने हायवेवर गाड्या तरंगत असल्याचे, पुरात फसलेल्या नागरिकांना सुरक्षा रक्षक वाचवत असल्याचे फोटो आहेत. आपत्कालीन प्रतिबंध प्राधिकरणाने २० पेक्षा अधिक हॉटेल्सशी संपर्क करून पुरात अडकलेल्या नागरिकांना निवारा देण्याचे आदेश दिले आहेत.

कतारची राजधानी दोहा येथील रस्ते पाण्यात बुडाले असून विश्वकप आयोजन स्थळाजवळच्या रस्त्यात पाण्यात तरंगत असलेल्या कार्स दिसत आहेत. हा वादळी पाउस आणखी एक आठवडा असाच बरसेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दोहा येथे ३८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. एकीकडे वाळवंटी भागात पूर आणि युरोपीय देशात उष्णतेची लाट असे दृश्य सध्या पाहायला मिळते आहे. जलवायू परिवर्तनाचे हे सर्वात घातक उदाहरण मानले जात आहे.