या रेस्टॉरंट मध्ये जेवणाचा आस्वाद घेतल्यावर ग्राहक चाटतात भिंती

जगभरात अनेक रेस्टॉरंट अनेक कारणांनी प्रसिद्ध आहेत. त्यातील काही हटके पदार्थांसाठी, काही खास परंपरांसाठी, काही वेगळ्या आर्कीटेक्चर साठी, काही अन्य कुठल्या कारणांनी चर्चेत येतात. अमेरिकेच्या अॅरीझोना मधील ‘ द मिशन’ नावाचे एक अजब रेस्टॉरंट एका अजब कारणाने प्रसिद्ध आहे. येथे ग्राहक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतल्यावर रेस्टॉरंटची भिंत जिभेने चाटतात. ऐकून विचित्र वाटेल पण त्यामागचे खरे कारण जाणून घेतलेत तर तुम्ही सुद्धा भिंत चाटण्यास आनंदाने तयार व्हाल असा हा प्रकार आहे.

या रेस्टॉरंटला जगभरातील प्रवासी, पर्यटक आवर्जून भेट देतात. येथील हेडशेफने या रेस्टॉरंटची भिंत पिंक हिमालयन सॉल्ट म्हणजे चक्क आपण ज्याचा वापर सैंधव म्हणून करतो त्या मिठापासून बनविली आहे. हे मीठ नैसर्गिक आणि आरोग्यासाठी चांगले मानले जाते. या मिठाची चव घेण्यासाठी ग्राहक ही भिंत चाटतात.

करोना काळात येथे कुणी जाणार नाही आणि भिंत चाटण्याचा तर प्रश्नच येणार नाही असे वाटत असेल तर मात्र ते चुकीचे आहे. येथील कर्मचारी सांगतात आजही येथे भरपूर ग्राहक येतात. भिंत चाटतात. कारण मुळात या सैंधव मिठामुळे आजार होत नाहीत आणि शरीराची सफाई हे मीठ करते. त्यामुळे ग्राहकांनी भीती बाळगण्याचे कारण नसते. शिवाय रेस्टॉरंट कर्मचारी रोजच्या रोज ही भिंत विशेष काळजी घेऊन साफ करतात. मग काय, करणार ट्राय?