उद्धव ठाकरे यांचे पुतणे निहार, एकनाथ शिंदे गटात दाखल
शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांना आणखी एक दणका बसला आहे. शुक्रवारी त्यांचे पुतणे निहार ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन त्यांना समर्थन जाहीर केले आणि शिंदे गटात प्रवेश केला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सर्वात मोठे पुत्र बिंदुमाधव ठाकरे यांचे निहार पुत्र आहेत. बिंदुमाधव यांचे १९९६ मध्ये वयाच्या ४२ व्या वर्षी अपघातात निधन झाले होते.
निहार ठाकरे यांचा विवाह गतवर्षी भाजप नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्येसोबत झाला आहे. शिंदे कार्यालयाकडून निहार यांच्या संदर्भातील एक पत्रक जारी केले गेले असून त्यात निहार ठाकरे, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली त्यांचा राजकीय प्रवास सुरु करत असल्याचे म्हटले गेले आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी त्यावर काहीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. दीर्घकाळ निहार राजकारणापासून दूर राहिले आहेत.
दरम्यान राष्ट्रवादीचे परभणीचे माजी खासदार आणि राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष सुरेश जाधव यांनीही एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांनी राष्ट्र्वादी उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे असे समजते.