उत्तर कोरियाच्या चलनाचे फोटो व्हायरल, मोज्यात लपवून आणली होती नोट
अनेकांना देशोदेशीच्या चलनांचा संग्रह करण्याचा छंद असतो. जगभरातून त्यासाठी विविध देशांची नाणी, नोटा असे संग्राहक गोळा करतात, त्याचे जतन करतात. अनेकांना जगापासून कायमच अलिप्त राहिलेल्या आणि त्यामुळे रहस्यमयी बनलेल्या उत्तर कोरियात कुठल्या नोटा वापरत असतील अशी उत्सुकता आहे. उत्तर कोरियातील चलनी नोटेचा एक फोटो सोशल मिडियावर वेगाने व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे हा फोटो शेअर करणाऱ्या न्यूझीलंडच्या जॉन याने ही नोट त्याने उत्तर कोरियाला काही वर्षांपूर्वी कामासाठी भेट दिली होती तेव्हा बुटाच्या मोज्यात लपवून आणली होती असा खुलासा केला आहे.
या रेडीट युजरने असा दावा केला आहे कि तो कामासाठी नॉर्थ कोरिया मध्ये गेला होता तेव्हा एका स्थानिक बसचालकाकडून त्याला ही नोट मिळाली. त्याने ती मोज्यात लपविली आणि देशात आणली त्याला काही वर्षे झाली आहेत. मात्र आज उत्तर कोरियाची नोट जगाला दाखविण्यासाठी त्याने फोटो शेअर केला आहे. या नोटेवर उत्तर कोरियाचे संस्थापक किम इल सुंग यांचा हसरा फोटो आहे. ही नोट ५००० मुल्याची आहे.
उत्तर कोरियाचा सध्याचा प्रमुख किम जोंग उनचे, किम इल सुंग हे आजोबा आहेत. उत्तर कोरियाच्या नागरिकांना अनेक बंधने पाळावी लागतात. घरात किमच्या सर्व वंशजांचे फोटो लावून फोटोना रोज नमस्कार करावा लागतो. येथील नागरिक त्यांच्या मर्जी प्रमाणे केस सुद्धा कापू शकत नाहीत. कुणाही नागरिकाला कोणत्याही कारणाने तुरुंगात टाकले जाते अथवा ठार केले जाते. करोना काळात या देशातील करोना स्थितीची माहिती कधीच जगासमोर येऊ शकली नाही. त्यामुळे या देशाची अंतर्गत बाब असलेली ही चलनी नोट जगासमोर आल्याने या नोटेच्या फोटोवर प्रतिक्रियांचा पाउस पडला आहे.