मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि भाजपने एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची सुरुवात औरंगाबाद महापालिकेपासून होणार आहे. या निर्णयानंतर शिंदे सेना आणि भाजप मुंबईसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. साहजिकच त्यांची मुख्य लढत शिवसेनेशी होणार असून शिवसेनेच्या व्होटबँकेला शिंदे सेनेमुळे झटका बसणार आहे आणि त्याचा थेट फायदा भाजपला होणार आहे.
एकत्र निवडणूक लढवणार शिंदे सेना आणि भाजप ! शिवसेनेच्या व्होटबँकेला बसणार झटका, वाढणार अडचणी
गेल्या 25 वर्षांपासून मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे, मात्र यावेळी त्यांच्यासमोर मोठे आव्हान आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांना आतापर्यंत मुंबईत शिवसेना फोडण्यात फारसे यश मिळालेले नाही. मुंबईतून यामिनी जाधव, मंगेश कुडाळकर, प्रकाश सुर्वे आणि सदा सरवणकर हे चार आमदार आणि खासदार राहुल शेवाळे शिंदे यांच्यासोबत गेले आहेत. औरंगाबादचा विचार केला, तर औरंगाबाद महापालिकेची निवडणूक शिंदे गट आणि भाजप एकत्र लढणार असल्याचे एकनाथ शिंदे यांच्या गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांनी गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. याबाबत प्राथमिक चर्चाही झाली आहे.
दरम्यान शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे शिवसेना ताब्यात घेण्याचे आणि ठाकरे कुटुंबाला शिवसेनेपासून वेगळे करण्याचे ध्येय वेगाने राबवत आहेत. याच अनुषंगाने ते शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांना आपल्या बाजूने ओढून घेण्यात मग्न आहेत. गुरुवारी त्यांनी शिवसेना नेते लीलाधर डाके आणि मनोहर जोशी यांची त्यांच्या घरी भेट घेतली.
लीलाधर डाके आणि मनोहर जोशी हे बाळासाहेब ठाकरेंच्या काळातील नेते. शिवसेना-भाजप युतीतील पहिल्या ‘शिवशाही सरकार’मध्ये मनोहर जोशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि लीलाधर डाके हे उद्योगमंत्री होते. शिवसेनेचे हे दोन्ही ज्येष्ठ नेते सध्या वयाच्या उतारावर आहेत. या दोन्ही नेत्यांच्या घरी एकनाथ शिंदे यांचेही जोरदार स्वागत करण्यात आले आहे.