कर्नाटक: मंगळुरूमध्ये तरुणाची निर्घृण हत्या, कलम 144 लागू, मुस्लिमांना घरात नमाज अदा करण्याच्या सूचना


मंगळुरू – कर्नाटकातील मंगळुरू जिल्ह्यात एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. दोन दिवसांपूर्वी दक्षिण कन्नड जिल्ह्यातील बेल्लारे येथे भाजपच्या एका नेत्याचा धारदार शस्त्रांनी गळा चिरला होता.

परिस्थिती तणावपूर्ण होत असल्याचे पाहून मंगळुरु जिल्ह्यातील सुरतकल भागात कलम 144 लागू करण्यात आले आहे. पोलिस प्रशासनाने शहरातील मुस्लिमांना त्यांच्या घरीच शुक्रवारची नमाज अदा करण्यास सांगितले आहे. सुरतकल हे मंगळुरू जिल्ह्याच्या सीमेवर आहे. येथे गुरुवारी सायंकाळी चार ते पाच अज्ञात सशस्त्र हल्लेखोरांनी एका 23 वर्षीय तरुणाची हत्या केली. अशीच घटना दोन दिवसांपूर्वी दक्षिण कन्नड जिल्ह्यातील बेल्लारे येथे भाजप नेते प्रवीण नेत्तारू यांच्यासोबत घडली होती. त्यांच्या दुकानासमोर दुचाकीवरून आलेल्या तीन हल्लेखोरांनी त्यांची हत्या केली. नेत्तरू हे दुकान बंद करून घरी जात असताना मंगळवारी रात्री ही घटना घडली.

मंगळुरूचे पोलिस आयुक्त एन शशी कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 जुलै रोजी रात्री 8 वाजता सुरतकलमधील कृष्णपुरा कटिपल्ला रोडवर एका 23 वर्षीय तरुणावर चार-पाच तरुणांनी अमानुष हल्ला केला होता. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. सुरतकल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरथकल, मुल्की, बाजपे, पणंबूरमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. या घटनेनंतरची संवेदनशील परिस्थिती लक्षात घेता सुरतकलमध्ये मोठ्या मेळाव्यावर बंदी घालण्याचे आदेश लागू करण्यात आले आहेत.

मुस्लिमांना विनंती, अफवांपासून सावध रहा
मंगळुरू पोलिसांनीही मुस्लिम नेत्यांना त्यांच्या घरी नमाज अदा करण्याची विनंती केली. आयुक्तांच्या हद्दीतील सर्व दारू दुकाने 29 जुलै रोजी बंद राहणार आहेत. सर्व नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. या घटनेमागील हेतू तपासण्यात येत असून दोषींचा शोध घेण्यात येत आहे.