म्हणून ‘मिग २१’ ला म्हटले जाते ‘खतरों के खिलाडी’
भारतीय हवाई दलाच्या मिग २१ लढाऊ विमानाला गुरुवारी रात्री अपघात होऊन त्यात दोन पायलट मृत्युमुखी पडले आहेत. बारमेरच्या उत्तरलई बेसवरून रोजच्या सरावासाठी हे विमान उडाले होते. विमानाला अचानक आग लागून ते कोसळल्याचे सांगितले गेले आहे. यानंतर पुन्हा एकदा मिग २१ लढाऊ विमाने चर्चेत आली आहेत. अतिशय उत्तम मारक क्षमतेची ही विमाने कोसळण्याचे प्रमाण पाहून या विमानांना काही वर्षांपासून ‘उडत्या शवपेट्या, फ्लाईंग कफिन्स’ असे म्हटले जात आहे.
१९५९ मध्ये बनलेली ही विमाने पहिल्या सुपरसोनिक लढाऊ विमानांपैकी आहेत आणि जगातील ६० पेक्षा अधिक देशांनी ती वापरली आहेत. एकेकाळी या विमानांची ओळख ‘खतरों के खिलाडी’ अशी होती आणि ती ओळख या विमानांनी अतिशय सार्थ ठरविली होती. गेली काही वर्षे ही विमाने सतत अपघातग्रस्त होत आहेत. यामुळे अनेक विमाने आणि आपले जांबाज पायलट आपण गमावले आहेत. मिग २१ बायसनच्या सहा तुकड्या भारतीय हवाई दलात आहेत आणि त्या प्रत्येक तुकडीत १८ विमाने आहेत.
बालाकोट हल्ल्यानंतर भारतीय हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानी एफ १६ जेट फायटरला याच मिग २१ बायसन जातींच्या विमानाने हद्दीबाहेर खदेडले होते आणि त्याचे पायलट होते ग्रुप कॅप्टन अभिनंदन. भारतीय हवाई दलात १९६४ मध्ये प्रथम ही सुपरसोनिक जेट फायटर सामील झाली. तेव्हा ही विमाने रशियात बनविली जात मात्र नंतर ही विमाने भारतात असेम्बल करण्याचा करार झाला आणि एचएएल (हिंदुस्तान एरॉनोटिकल लिमी)ने त्यांचे उत्पादन सुरु केले. रशियाने या विमानांचे उत्पादन १९८५ मध्ये बंद केले आहे.
भारतात या विमानाचे अपग्रेड व्हर्जन वापरले जाते. सर्वात तेज गतीने जाणाऱ्या या पहिल्या सुपरसोनिक विमानांच्या वेगाची अमेरिकेला सुद्धा दहशत वाटत असे. आजही भारतासह अन्य अनेक देशांची हवाई दले ही विमाने वापरत आहेत. सर्वाधिक संख्येने बनविले गेलेले हे विमान असून त्याची ११४९६ युनिट बनविली गेली आहेत. १९७१चे पाक युद्ध आणि १९९९ च्या कारगिल युद्धात या विमानांनी फार महत्वाची भूमिका बजावली आहे.
मिग २१ बायसन हे अपग्रेडेड व्हर्जन आणखी ३ ते चार वर्षे भारतीय हवाई दल वापरू शकणार आहे. हे व्हर्जन फक्त भारतीय हवाई दल वापरते. शॉर्ट रेंज, मिड रेंज मिसाईल्स वाहून नेण्यास हे विमान सक्षम आहे. त्यांचा वेग ताशी २२२९ किमी असून रेंज आहे ६४४ किमी. बायसनची रेंज १ हजार किमी आहे. व्हिएतनाम युद्धात व्हिएतनामच्या याच विमानांनी अमेरिकेला जेरीला आणले होते.