पाकिस्तानात म्हशीपेक्षा स्वस्तात मिळताहेत सिंह

पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती जगापासून लपून राहिलेली नाही. आर्थिक संकटातून बाहेर पडण्याचे देशाचे सर्व प्रयत्न फोल ठरत आहेत. महागाईचा परिणाम केवळ खाण्यापिण्याच्या वस्तूंपुरताच मर्यादित राहिला नसून त्याची झळ पशुपालन करणाऱ्यांना लागते आहे. मिळालेल्या माहितीनुसार लाहोर सफारी प्राणी संग्रहालयात सिंहांच्या देखभालीचा खर्च परवडेनास झाल्याने येथील १२ सिंह विक्रीला काढले गेले आहेत. समा टीव्ही वर दिल्या गेलेल्या माहितीनुसार हे सिंह प्रत्येकी दीड लाख रुपयात विकले जाणार आहेत. विशेष म्हणजे पाकिस्तानात म्हशींची किंमत ३ ते १० लाख पाकिस्तानी रुपयांच्या दरम्यान आहे. म्हणजे पाकिस्तानात जंगलच्या राजाची किंमत म्हशीपेक्षा कमी झाली आहे.

लाहोर सफारी प्राणीसंग्रहालय प्रशासनाने ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात १२ सिंह विक्रीसाठी उपलब्ध केले आहेत. त्यात तीन सिंहिणी आहेत. या सिंहाच्या विक्रीतून मिळणारे पैसे अन्य प्राण्यांच्या देखभालीसाठी वापरले जाणार आहेत. महागाई मुळे सिंह सांभाळणे कठीण झाले असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. लाहोरचे हे प्राणीसंग्रहालय सुमारे १४२ एकर जागेत असून तेथे अनेक जंगली प्राणी आहेत. या ठिकाणी ४० सिंह आहेत. गेल्या वेळी सुद्धा पैशाची चणचण जाणवू लागल्यावर १४ सिंह विकले गेले होते असे समजते. सिंह देखभाली साठी जागा अधिक लागते, कर्मचारी अधिक लागतात त्यामुळे देखभालीचा खर्च जास्त येतो असे सांगितले जाते.