युक्रेन राष्ट्रपतींचे पत्नीसोबत फोटो शूट, झाले टीकेचे धनी

रशियाकडून सातत्याने सुरु असलेल्या हल्ल्यांमुळे युक्रेन मध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर युक्रेनचे राष्ट्रपती बोदिमीर झेलेन्स्की यांनी पत्नीसोबत एका मासिकासाठी केलेल्या फोटोशूट मुळे त्यांच्यावर टीकेचा भडीमार होऊ लागला आहे. वोग या मासिकासाठी केल्या गेलेल्या या फोटो शूटचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत आणि त्यामुळे युद्धग्रस्त जनतेच्या रोषाला तोंड देण्याची वेळ झेलेन्स्की यांच्यावर आली आहे.

युक्रेनवर रशियाचे हल्ले सुरु आहेत. रोज शेकडो नागरिक मरत आहेत तर ५० लाखाहून अधिक नागरिकांना अन्य देशांच्या आश्रयाला जावे लागले आहे. हजारो सैनिक शहीद झाले आहेत आणि रोज शेकडो सैनिक देशासाठी जीव कुर्बान करत आहेत. झेलेन्स्की यांचे पत्नीसोबतचे फोटो शूट यामुळेच वादग्रस्त ठरले आहे. झेलेन्स्की युद्ध सुरु असताना अनेक मोर्चांवर दिसले आहेत. सेनेचे मनोबल वाढविण्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत आणि यामुळेच रशियाला अजून युक्रेन जिंकता आलेले नाही. हे खरे असले तरी युक्रेन मधील परिस्थिती गंभीरच आहे हे नाकारता येत नाही.

वोग मासिकासाठी केलेल्या या फोटोशूट मध्ये झेलेन्स्की, फर्स्ट लेडी ओलेना खुर्चीवर बसून एकमेकांचे हात हातात घेतलेल्या पोझ मध्ये दिसत आहेत शिवाय अन्य अनेक पोझ मधील त्यांचे फोटो व्हायरल होत आहेत. ऑगस्ट महिन्याच्या वोग मासिकाच्या कव्हरपेज साठी हे फोटो शूट झाले असल्याचे समजते. अनेक नागरिकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. युद्धात जवान शहीद होत आहेत आणि प्रेसिडेंटना फोटो साठी वेळ मिळतो कसा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.