झिम्बाब्वेने चलनात आणली सोन्याची नाणी

झिम्बाब्वे सरकारने देशात कागदी नोटांच्या ऐवजी सोन्याची नाणी चलनात आणली गेल्याची घोषणा केली असून या जमान्यात सोन्याची नाणी चलन म्हणून स्वीकारणारा तो पहिला देश बनला आहे. अर्थात या मागचे कारण देशातील प्रचंड वाढलेली महागाई हे असल्याचे समजते. झिम्बाब्वे मध्ये महागाई १९२ टक्के वाढली असून अमेरिकी डॉलरच्या तुलनेत देशाचे चलन वेगाने घसरत चालले आहे. या एका वर्षात झिम्बाब्वेचे चलन ७२ टक्के घसरले आहे. २००८ पासून ही घसरण सुरुच आहे आणि कोणत्याही क्षणी आपला पैसा म्हणजे कागदाचे कपटे बनू शकतो अशी भीती जनतेच्या मनात आहे.

यामुळे झिम्बाब्वे मधील नागरिक डॉलर्स खरेदीला प्राधान्य देत आहेत. परिणामी डॉलर्सची मागणी वाढल्याने परिस्थिती आणखी गंभीर बनली असून झिम्बाब्वेचे चलन अधिक कमजोर झाले आहे. हा ट्रेंड रोखण्यासाठी सरकारने सोन्याची नाणी चलनात आणण्याचा निर्णय जाहीर केला आहे. केंद्रीय बँकेने केलेल्या घोषणेनुसार नागरिक कागदी नोटा बँकेत बदलून त्या ऐवजी सोन्याची नाणी घेऊ शकणार आहेत तसेच दुकानातून सुद्धा ही नाणी नागरीकाना मिळू शकणार आहेत.

आपण चलनाचा इतिहास पाहिला तर असे दिसते की, इसवी सन पूर्व १५०० मध्ये एका वस्तू ऐवजी दुसरी वस्तू देऊन व्यवहार होत असत. याला बार्टर सिस्टीम म्हटले जात असे. इसवी सन ८०० पूर्व मध्ये धातूची नाणी चलनात आली. इसवी सन पूर्व ५०० मध्ये कलदार म्हणजे प्रतिमा कोरलेली नाणी चलनात होती. २३०० वर्षापूर्वी सोने चांदीची नाणी आली. १३ व्या शतकात चीनने कागदी नोटा चलनात आणल्या पण १५ व्या शतकात पुन्हा सोने चांदीची नाणीच वापरत आली. १७ व्या आणि १८ व्या शतकात पश्चिम युरोप मध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार वाढला तेव्हा खासगी बँकाने कागदी नोटा चलनात आणल्या. आजकाल देशाचे चलन खासगी बँका नाही तर सरकार जारी करते.