कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धा- पीव्ही सिंधू टीम इंडियाची ध्वजवाहक

बर्मिंघम येथे आज सुरु होत असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२२ साठी भारताची ध्वजवाहक म्हणून बॅडमिंटन स्टार, ऑलिम्पिक विजेती खेळाडू पीव्ही सिंधू हिची निवड केल्याची घोषणा भारतीय ऑलिम्पिक समितीने केली आहे. अगोदर हा मान भारताचा गोल्डन बॉय, भालाफेक चँपियन नीरज चोप्रा याला दिला गेला होता मात्र त्याने दुखापती मुळे या स्पर्धेतून माघार घेतली आहे. टोक्यो ऑलिम्पिक मेडलिस्ट वेटलिफ्टर मीराबाई चानू आणि बॉक्सर लवलिना बोरगेहेन यांच्या नावाची चर्चा ध्वजवाहक म्हणून होत होती पण अखेरच्या क्षणी सिंधूच्या नावाची घोषणा केली गेली आहे.

भारतीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष अनिल खन्ना यांनी या संदर्भात पीवी सिंधू हिच्या नावाची घोषणा झाल्याचे सांगून तिला शुभेच्छा दिल्या आहेत. २८ जुलै पासून सुरु होत असलेल्या या स्पर्धा ८ ऑगस्ट पर्यंत चालणार आहेत. त्यात भारताचे २१५ खेळाडूंचे पथक, विविध १५ क्रीडा प्रकारात सामील होणार आहेत. सिंधू कडून यावेळी सुवर्ण पदकाची अपेक्षा केली जात आहे.

राष्ट्रकुल स्पर्धांची सुरवात १९३० मध्ये झाली आणि यंदाचा हा २२ वा सिझन आहे. यावेळचे विशेष म्हणजे पुरुष खेळाडूंच्या तुलनेत महिला खेळाडूंची संख्या जास्त आहे. सिंधूला भारताची ध्वजवाहक केल्याने देशातील खेळाडू महिलांना प्रोत्साहन मिळेल असे ऑलिम्पिक समितीने स्पष्ट केले. सिंधू यावेळी बॅडमिंटन महिला एकेरी साठी सुवर्णपदकाची दावेदार मानली जात आहे. तिने यापूर्वी गोल्ड कोस्ट आणि ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत अनुक्रमे रजत आणि कांस्य पदकाची कमाई केली आहे.