T20 World Cup 2022 : रिकी पाँटिंगची भविष्यवाणी, भारत आणि ऑस्ट्रेलियात होणार फायनल, जाणून घ्या कोण होणार विजेता


नवी दिल्ली – ऑस्ट्रेलियाचा दोन वेळा विश्वचषक जिंकणारा कर्णधार रिकी पाँटिंगने मंगळवारी (26 जुलै) आगामी टी-20 विश्वचषकाबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. या वेळी अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित करणाऱ्या दोन संघांबद्दल त्याने सांगितले. एवढेच नाही, तर टी-20 वर्ल्ड कपमध्ये कोणता संघ चॅम्पियन होईल, हेही पाँटिंगने सांगितलं.

आयसीसी रिव्ह्यूमध्ये संजना गणेशनला दिलेल्या मुलाखतीत पाँटिंग म्हणाला की, यावेळी भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ आपापसात फायनल खेळतील. गेल्या वेळी झालेल्या अंतिम फेरीत न्यूझीलंडचा पराभव करून ऑस्ट्रेलियाने प्रथमच विजेतेपद पटकावले होते. यावेळी कांगारू संघ जेतेपद वाचवू शकेल, असा विश्वास पाँटिंगला आहे. त्यांना घरच्या मैदानाचा आणि समर्थकांचा फायदा मिळेल.

पाँटिंग म्हणाला, मला वाटते भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ अंतिम फेरीत खेळतील. तिथे भारताला हरवून ऑस्ट्रेलियन संघ पुन्हा चॅम्पियन बनेल. गतविजेत्याची घरची परिस्थिती आहे. गेल्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाच्या संघाकडे ही गोष्ट नव्हती. यावेळी त्याच्यासाठी जरा बरे आहे.

इंग्लंड देईल तगडी टक्कर : पाँटिंग
2003 आणि 2007 मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकणाऱ्या पाँटिंगला जेव्हा विचारण्यात आले की भारत आणि ऑस्ट्रेलियाला कोण धोका देईल, तेव्हा त्याने इंग्लंडचे नाव घेतले. पाँटिंग म्हणाला, इंग्लंडकडे अजूनही अनेक मॅचविनर्स आहेत. माझ्या मते मर्यादित षटकांमध्ये इंग्लंड हा संघ मजबूत आहे. भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे संघ या स्पर्धेत चांगली कामगिरी करू शकतात.

भारताचे वेळापत्रक
भारताचा पहिला सामना 23 ऑक्टोबर (रविवार) रोजी मेलबर्नमध्ये पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. त्यानंतर 27 ऑक्टोबरला (गुरुवार) टीम इंडियाची क्वालिफायरमध्ये ग्रुप-अ मधील दुसऱ्या स्थानावरील संघाशी लढत होईल. 30 ऑक्टोबरला (रविवार) भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेशी भिडणार आहे. 2 नोव्हेंबर (बुधवार) बांगलादेशचा सामना 6 नोव्हेंबर (रविवार) रोजी क्वालिफायरमध्ये ब गटातील दुसऱ्या स्थानावरील संघाशी होईल.