भारतीय बँकामध्ये ४८ हजार कोटीं रक्कम बेवारस

देशातील बँकामध्ये कोट्यावधींच्या रकमा दावा न केल्याने बेवारस पडून आहेत. याची नोंद घेऊन रिझर्व बँकेने खरे मालक शोधण्याची एक मोहीम हाती घेतल्याचे समजते. देशात आज महागाईचा भडका उडाला आहे आणि पै पै वाचविण्याचा प्रयत्न सर्वसामान्य जनता करते आहे. अश्या वेळी बँकामध्ये इतकी प्रचंड रक्कम पडून असल्याचे समोर आले आहे. ही रक्कम ४८२६२ कोटींवर गेली आहे. याला अन्क्लेम्ड मनी असे म्हटले जाते.

देशाच्या आठ राज्यात असा अन्क्लेम्ड मनी अधिक प्रमाणात आहे. ही रक्कम योग्य वारसापर्यंत पोहोचविण्याचे आव्हान आहे. वर्ष २०२०-२१ मध्ये अशी अन्क्लेम्ड रक्कम ३९२६२ कोटी होती ती २०२१-२२ मध्ये ४८२६२ कोटींवर गेल्याचे आकडेवारी सांगते. तामिळनाडू, पंजाब, गुजराथ, महाराष्ट्र, बंगाल, कर्नाटक, बिहार, तेलंगाना, आंध्र या राज्यांचा त्यात समावेश आहे. बँक खातेदाराने १० वर्षात त्याच्या खात्यातून काहीच देवघेव केली नसेल तर किंवा जमा ठेवी मुदत संपल्यावर सुद्धा १० वर्षे त्यावर दावा केला नसेल तर या पैशाना अन्क्लेम्ड मनी मानले जाते. या रकमेवर दावेदार नसला तरी व्याज राहते. ग्राहक बँकेत जाऊन असे आपले खाते पुन्हा ओपन करू शकतो आणि त्यावर व्याजासह पैसे मिळवू शकतो.

या बाबत बँका अनेकदा जागृती करतात पण तरीही अनेक केसेस मध्ये खरे मालक समोर येत नाहीत. परिणामी अन्क्लेम्ड रक्कम वाढत जाते असे समजते.