चीन मध्ये नागरिकांना गृह कर्ज हप्ते डोईजड , जिनपिंगना बसू शकतो फटका

चीन मध्ये बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड वाढून ८ कोटींवर गेले असतानाच चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांना आता मध्यमवर्गीय जनतेने दणका दिला आहे. ग्राहकांनी घर खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर गृह कर्जे घेतली आहेत मात्र त्याचे हप्ते भरणे या ग्राहकांना शक्य होत नाही. परिणामी चीनच्या ३१ पैकी २४ प्रांतातील २३५ प्रोपर्टी प्रोजेक्ट मध्ये १.३ कोटी ग्राहकांनी ईएमआय भरणे बंद केले आहे. बांधकाम व्यावसायिक वेळेवर पझेशन देत नाहीत, दीर्घकाळ घराची भाडी भरावी लागतात आणि ईएमआय सुद्धा भरावे लागतात यामुळे हे ग्राहक त्रासून गेले आहेत आणि त्यांनी ईएमआय बंद केले आहेत.

चीनी सरकारच्या झिरो कोविड पॉलीसी मुळे अनेक क्षेत्रांना नुकसान सोसावे लागले आहे. रीयल इस्टेट साठी फंड उपलब्ध न झाल्याने प्रोजेक्ट वेळेवर पूर्ण होऊ शकलेले नाहीत. ग्लोबल टाईम्सच्या अहवालानुसार चीन मध्ये ७० टक्के नागरिक रियल इस्टेट मध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात पण करोना मुळे बेरोजगारी वाढली आहे. लोकांच्या नोकऱ्या गेल्याने इन्कम बंद आहे आणि त्यामुळे नवीन गुंतवणूक शक्य झालेली नाही.

कोविड काळात शी जिनपिंग यांची लोकप्रियता घटली आहे आणि त्यांना नागरिक उघडपणे विरोध करू लागले आहेत. बँकिंग समस्या उग्र रूप घारण करते आहे. लोकांना बँकेतून पैसे काढता येत नाहीत. नोव्हेंबर मध्ये शी जिनपिंग कम्युनिस्ट पार्टी अधिवेशनात तिसऱ्या वेळी राष्ट्रपती पदासाठी दावेदारी करणार आहेत. पण देशातील असंतोषाचा फटका त्यांना बसेल असा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत.