राष्ट्रपती भवन मेन्यूमध्ये सामील होणार पखाल, सह्जनी साग

देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांनी सूत्रे स्वीकारली आहेत. रायसीनाच्या या प्रमुख भवनात त्यामुळे काही बदल होत असून प्रामुख्याने स्वयंपाकघरात म्हणजे किचन मध्ये ओडिसी खाद्यपदार्थांना स्थान दिले जाईल अशी चर्चा सुरु झाली आहे. मुर्मू ओडिशाच्या आहेत आणि त्यांच्या अत्यंत आवडीचे पखाल आणि सहजनी साग यांना किचन मध्ये समाविष्ट केले जाईल असे सांगितले जात आहे.

पखाल म्हणजे शिजविलेल्या भातात पाणी घालून तो काही तासांसाठी तसाच ठेवणे. आणि सहजन म्हणजे शेवगा. त्याची भाजी. ओडीसा मध्ये हे दोन्ही पदार्थ लोकप्रिय आहेत. मुर्मू जेव्हा कधी माहेरी म्हणजे उपरखेद येथे जातात तेव्हा अगोदरच वहिनीला हे दोन पदार्थ खायचे आहेत अशी मागणी करतात.

राष्ट्रपती भवनात दर वेळी नवे राष्ट्रपती नियुक्त झाले कि त्यांच्या आवडीचे पदार्थ मेन्यू मध्ये सामील केले जातात. प्रणव मुखर्जी राष्ट्रपती बनले तेव्हा बंगाली पदार्थ मेन्यू मध्ये सामील केले गेले. तसेच दक्षिणेकडील राज्यातून आजपर्यंत सात राष्ट्र्पती नियुक्त झाले तेव्हा दाक्षिणात्य पदार्थांना मेन्यू मध्ये स्थान मिळाले होते. नव्या राष्ट्रपती मुर्मू पूर्ण शाकाहारी असून अत्यंत साधे जेवण घेतात. पखाल बनविण्यासाठी फारशी मेहनत करावी लागत नाही. उन्हाळ्यात पखाल खाल्याने पोटात गारवा राहतो आणि झोप चांगली लागते.

पखाल सोबत शेवग्याची भाजी, वांगी बटाटा भरीत, लिंबू, मिरची आणि मासे खाण्याची पद्धत आहे. २० मार्च हा दिवस ओडिशा मध्ये पखाल दिवस म्हणून साजरा केला जातो.