मार्क झुकेरबर्गने जुने घर विकून मिळविला इतका नफा

फेसबुकचा सहसंस्थापक मार्क झुकेरबर्ग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सध्या फेसबुकची कमाई कमी होत चालली असतानाच मार्कने १०० वर्षापूर्वीचे त्याचे घर विकून प्रचंड नफा कमावला आहे. ७ हजार चौरस फुटाचे हे घर मार्कने १० वर्षांपूर्वी ज्या किमतीला खरेदी केले त्याच्या तिप्पट किंमतीला विकले आहे.  याचबरोबर सॅन फ्रान्सिस्को मध्ये सर्वात महाग घर विकण्याचे रेकॉर्ड सुद्धा त्याने नोंदविले आहे.

हे घर सॅन फ्रान्सिस्कोच्या व्हीआयपी भागात आहे. डोलोरस पार्कजवळ शांत लिबर्टी हिल परिसरात हा बंगला असून मार्कने तो नोव्हेंबर २०१२ मध्ये १० दशलक्ष डॉलर्स म्हणजे ८० कोटींना खरेदी केला होता. त्याच्या नूतनीकरणावर मार्कने बराच खर्च केला होता. घर विक्रीच्या जाहिरातीनुसार हा बंगला १९२८ मध्ये बांधला गेला आहे. फेसबुकचा आयपीओ आल्यावर काही दिवसातच मार्कने हे घर खरेदी केले होते. हे घर मार्कने ३१ दशलक्ष डॉलर्स म्हणजे २५० कोटी रुपयांना विकले आहे.

मार्क कडे या घराशिवाय अन्य अनेक घरे आहेत. त्यात तीन अलिशान घरे सामील आहेत. एक सिलिकॉन व्हॅलीमध्ये, एक लेक ताहोये येथे तर आणखी एक हवाई मध्ये आहे. ब्लूमबर्गच्या धनकुबेरांच्या यादीत मार्क अनेक वर्षे टॉप १० मध्ये होता मात्र आता त्याचा नंबर १७ वर घसरला आहे. फेसबुक आणि मेटाच्या शेअर मधील घसरण त्यासाठी कारणीभूत ठरली आहे.