कॅम्पबेल विल्सन एअरइंडियाचे नवे सीईओ

टाटा समूहाच्या ताब्यात आलेल्या एअरइंडिया ला नवा सीईओ मिळाला आहे. कॅम्पबेल विल्सन यांची नियुक्ती एअरइंडियाचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून टाटा समूहाने १२ मे रोजी जाहीर केली होती. आता या नियुक्तीला केंद्रीय गृह मंत्रालयाकडून सिक्युरिटी क्लीअरन्स दिला आहे. नागरी विमान उड्डयन नियमानुसार परदेशी व्यक्तीची एअरलाईन प्रमुखपदी नियुक्ती करायची असेल तर केंद्रीय गृहमंत्रालयाकडून त्यासाठी परवानगी घ्यावी लागते.

टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी १२ मे रोजी कॅम्पबेल यांची एअरइंडियाचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून  नियुक्ती झाल्याची घोषणा करून कॅम्पबेल यांचे भारतात स्वागत करताना आनंद होत असल्याचे म्हटले होते. त्यांच्या अनुभवाच्या फायदा एअरइंडियाला वर्ल्ड क्लास बनविण्यास उपयुक्त ठरेल असेही त्यांनी सांगितले होते.

५० वर्षीय विल्सन यांना या क्षेत्राचा २६ वर्षांचा अनुभव आहे. फुल सर्व्हिस आणि लो कॉस्ट अश्या दोन्हीचा त्यांना अनुभव आहे. विल्सन यांनी सिंगापूर एअरलाईन्स साठी जपान, कॅनडा आणि हॉंगकॉंग येथे १५ वर्षे काम केले आहे. विल्सन यानी टाटा ग्रुपशी जोडले गेल्याने सन्मान झाल्यासारखे वाटत असल्याची भावना व्यक्त केली आहे. टाटा सन्स यांच्या कडे सध्या तीन एअरलाईन्स आहेत. एअर एशिया, विस्तारा आणि एअरइंडिया. पैकी एअरइंडियाचा १०० टक्के हिस्सा सरकारकडून टाटांनी १८३०० कोटी मध्ये खरेदी केला आहे. सध्या देशातील ही दोन नंबरची विमान सेवा आहे.