अमेरिकेत डॉक्टर्सचा तुटवडा

अमेरिकेत डॉक्टर्सचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत असून त्याचा विपरीत परिणाम शहरांबरोबर छोट्या गांवावर पडला आहे. यामुळे डॉक्टर्सचा सल्ला हवा असेल तर महिनाभर अगोदर वेळ घ्यावी लागते आहे आणि जेथे डॉक्टर तपासणी साठी उपलब्ध आहेत तेथे रुग्णांच्या मोठ्या रांगा लागल्याचे दृश्य आता सर्वसामान्य झाले आहे. अनेक रुग्णांना वेळेवर उपचार न मिळाल्याने त्यांच्या तब्येती गंभीर बनत आहेत. करोना संकटामुळे परिस्थिती अधिक धोकादायक बनल्याचे सांगितले जात आहे.

असोसिएशन ऑफ अमेरिकन मेडिकल कॉलेजकडून प्रसारित केलेल्या आकडेवारीनुसार देशात सध्या १०.७३ लाख डॉक्टर्स आहेत पण या वर्षात त्यातील सुमारे ४ लाख डॉक्टर्स निवृत्त होत आहेत. यामुळे २०३३ सालापर्यंत अमेरिकेत ५४१०० ते १,३९००० डॉलर्सची कमतरता जाणवणार आहे.

कायझर फॅमिली फौंडेशनच्या रिपोर्ट नुसार अमेरिकेत ८.३७ कोटी नागरिक अश्या क्षेत्रात राहत आहेत जेथे प्राथमिक उपचाराची सुविधा नाही. ही गरज पूर्ण करण्यासाठी आत्ताच १४८०० डॉक्टर्सची आवश्यकता आहे. सरकार डॉक्टर्सची नवी भरती करत नाही. त्यात वंशभेद हेही एक कारण आहे. अमेरिकेत अश्वेत डॉक्टर्सची संख्या खूपच कमी आहे. परिणामी देशातील आरोग्य व्यवस्था ढेपाळण्याची भीती व्यक्त होत आहे.