New Controversy : ‘कॅथॉलिक मिशनरी नसते तर तामिळनाडूचा बिहार झाला असता’, सभापतींच्या वक्तव्यावरुन वाद


चेन्नई : तामिळनाडू विधानसभेचे अध्यक्ष एम. अप्पावू यांच्या दाव्यावरून राज्यात वाद निर्माण झाला आहे. कॅथलिक मिशनरी नसते, तर तामिळनाडू हे दुसरे बिहार बनले असते, असा दावा अप्पावू यांनी केला. राज्याच्या विकासाचे श्रेय त्यांनी कॅथलिक मिशनऱ्यांना दिले आणि त्यांच्यामुळेच आज तामिळनाडूचा विकास झाल्याचे त्यांनी सांगितले.

अप्पावू यांच्या वक्तव्यावर भाजपकडून जोरदार टीका करण्यात आली आहे. त्यांच्या वक्तव्याला ‘जातीयवादी वक्तव्य’ म्हणत भाजपने माफीची मागणी केली आहे. भाजपचे प्रवक्ते मोहन कृष्णा म्हणाले की, तामिळनाडूच्या सभापतींनी माफी मागावी. भाजप नेत्याने तामिळनाडूतील सत्ताधारी द्रमुकवरही निशाणा साधला. ते म्हणाले की, द्रमुकची मानसिकता हिंदूविरोधी आहे.

मिशनरींनी माझे जीवन घडवले: सभापती
कॅथलिक मिशनरींनी आपले जीवन घडवले असा दावाही स्पीकर अप्पावू यांनी केला. सध्याचे सरकार कॅथलिक लोकांचे आहे, जे उपवास करतात आणि देवाला प्रार्थना करतात. सभापती म्हणाले, हे सरकार तुमच्या सर्वांनी मिळून बनवले आहे, हे मुख्यमंत्र्यांना [एमके स्टॅलिन] माहीत आहे. तमिळनाडूतून कॅथॉलिक समुदाय काढून टाकला असता, तर विकास झाला नसता आणि तमिळनाडूची अवस्था बिहारसारखी झाली असती.

ख्रिश्चन मिशनऱ्यांनी आणली समानता आणि शिक्षण
तामिळनाडूमध्ये ख्रिश्चन समाजाच्या संस्था नसत्या, तर त्यांची अवस्था बिहारसारखी झाली असती, असेही ते म्हणाले. त्यांच्या वक्तव्यावर गदारोळ झाल्यानंतर सभापती अप्पावू म्हणाले की, ते फक्त इतिहासाचा संदर्भ देत आहेत. राज्यातील शिक्षणाच्या प्रसारात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आणि समाजात समानता आणली. त्यांचे कार्य द्रविड चळवळीचा विस्तार आहे. आपल्या शिक्षणाचे श्रेयही त्यांनी मिशनऱ्यांना दिले.

द्रमुक सरकार करते हिंदूंचा अपमान
भाजपचे प्रवक्ते मोहन कृष्णा यांनी स्पीकर अप्पावू यांच्या वक्तव्यावर जोरदार टीका केली आणि म्हणाले की, द्रमुक सत्तेत आल्यापासून नेहमीच वादात सापडला आहे. या सरकारचा अजेंडा तामिळनाडूतील हिंदूंना अपमानित करणे आणि राज्यात हिंदुविरोधी प्रचार करणे हा आहे.