Hooch Tragedy : गुजरातमध्ये विषारी दारू प्यायल्याने 19 जणांचा मृत्यू, 40 हून अधिक रुग्णालयात दाखल


अहमदाबाद : गुजरातमधील बोताड जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्याने 19 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी, 40 हून अधिक लोकांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाच्या तपासादरम्यान आतापर्यंत 10 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्यावर विषारी दारू तयार करून विक्री केल्याचा आरोप आहे.

गुजरातचे डीजीपी आशिष भाटिया म्हणाले की, ताब्यात घेतलेल्या सर्वांची चौकशी केली जात आहे. तत्पूर्वी, मृतांपैकी एकाच्या पत्नीने सांगितले होते की, रविवारी रात्री विषारी दारू प्यायल्यानंतरच पतीची तब्येत बिघडली. विषारी दारू प्यायल्याने रुग्णालयात दाखल झालेल्या हिम्मतभाई नावाच्या व्यक्तीने सांगितले की, अनेक लोक आजारी पडले आहेत.

या गावांमध्ये विषारी दारूचा कहर
बोताड जिल्ह्यातील रोजिंद, अनियाणी, आकरू, चांदेरवा, उंचाडी या गावातील लोक बनावट दारू पिऊन आजारी पडल्याच्या बातम्या आहेत. सर्वच गावात गोंधळाचे वातावरण आहे. दुसरीकडे, भावनगर रेंजचे आयजी अशोककुमार यादव यांनी सायंकाळीच बोताड येथील सिव्हिल हॉस्पिटलला भेट दिली. ते म्हणाले की या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे, जी डीएसपी दर्जाच्या अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली काम करेल.

राज्यात आहे संपूर्ण दारूबंदी
विशेष म्हणजे गुजरातमध्ये दारूवर पूर्ण बंदी आहे. येथे बॉम्बे प्रोहिबिशन अॅक्ट, 1949 अन्वये मद्य खरेदी, मद्यपान आणि बाळगणाऱ्यांवर कारवाई पोलीस करू शकतात. दोषी आढळलेल्यांना तीन महिन्यांपासून ते पाच वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षाही भोगावी लागते.

केजरीवालांचा टोमणा – विषारी दारू विक्रीचा पैसा जातो कुठे?
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी गुजरातमधील विषारी दारू शोकांतिका “दुर्दैवी” असल्याचे म्हटले आणि “कोरड्या” राज्यात दारू विकणाऱ्यांना राजकीय संरक्षण मिळते. बनावट दारूच्या विक्रीतून मिळणारा पैसा कुठे जातो, याची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. केजरीवाल म्हणाले, गुजरातमध्ये दारूबंदी असूनही मोठ्या प्रमाणात अवैध दारू विकली जाते हे दुर्दैवी आहे. दारू विकणारे हे कोण आहेत? त्यांना राजकीय आश्रय मिळतो. दारू विक्रीतून मिळालेला पैसा जातो कुठे? आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक केजरीवाल सोमवारी गुजरातच्या पोरबंदर विमानतळावर पोहोचले तेथून ते सोमनाथला गेले.