व्हायरल झाला १४३ वर्षे जुना जीन्सचा फोटो

जीन्स लहान मुलांपासून प्रौढ व्यक्तीपर्यत आजही क्रेझ बनल्या आहेत. रीप्ड, बॅगी, लो वेस्ट, कॅज्युअल, स्कीन फिट असे जीन्सचे अनेक प्रकार आणि स्टाईल्स आहेत. जीन्स बनविणाऱ्या आज अनेक कंपन्या नावारूपाला आल्या आहेत. मात्र सर्वात जुन्या जीन्सचा एक फोटो सध्या सोशल मिडीयावर वेगाने व्हायरल झाला आहे. ही जीन्स १४३ वर्षे जुनी लिवाईस कंपनीची आहे.

आजही या लिवाइस स्ट्रॉस अँड कंपनीच्या जीन्स जगात सर्वाधिक विकल्या जातात. जीन्स बनविणारी ही जगातील पहिली कंपनी आपले नाव आजही राखून आहे. एका ट्वीटर अकौंटवर या कंपनीच्या जुन्या जीन्सचा फोटो शेअर केला गेला असून १४३ वर्षानंतर सुद्धा ही जीन्स विरलेली दिसत नाही. १८७९ मध्ये बनलेल्या आणि आजच्या जीन्सच्या रुपात फारसा बदल नाही. फक्त ही जीन्स थोडी जुनी दिसते आहे. अगदी तिचे रिबेट सुद्धा ओरीजीनल आहेत.

विशेष म्हणजे या जीन्स मध्ये मोठ्या खिशाच्या वर एक छोटा खिसा आहे. याचा अर्थ तेव्हापासूनच जीन्सच्या खिशात एक छोटा खिसा लावला जात होता. १८५३ मध्ये लिवाइस कंपनी स्थापन झाली तेव्हा कंपनीच्या मालकाने खिशाच्या आत छोटा खिसा असलेल्या निळ्या रंगाच्या जीन्सचे पेटंट घेतले होते असे सांगितले जाते. आज या छोट्या खिशाचा वास्तवात काही उपयोग नाही तरी जुन्या डिझाईन फॉलो करण्याची आवड म्हणून आजही असे खिसे जीन्सला शिवले जातात असेही सांगितले जाते.