भारताच्या राष्ट्रपतींची आहेत आणखी दोन निवासस्थाने

भारताच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांनी शपथग्रहण केल्यावर पहिले चर्चेत आले ते राष्ट्रपती भवन. राष्ट्रपतींचे हे अधिकृत निवासस्थान अडीच किमी. परिसरात आणि १९० एकरात वसलेले असून त्यात ३४० खोल्या आहेत याची माहिती आपल्याला आहे. पण या निवासस्थाना शिवाय राष्ट्रपतींची आणखी दोन अधिकृत निवासस्थाने देशात आहेत याची माहिती फार थोड्या लोकांना आहे. यातील एक सिमला येथे तर दुसरे हैद्राबाद येथे आहे. वर्षातून एक वेळा राष्ट्रपती येथे येतात असे सांगितले जाते.

राष्ट्रपती जेव्हा या दोन निवासस्थानी येतात तेव्हा त्यांचे कार्यालय येथे स्थानांतरीत केले जाते. सिमला येथील निवासाचे नाव ‘द रिट्रीट बिल्डींग’ असे असून ते एका पहाडावर १००० फुट उंचीवर वसलेले आहे. अतिशय निसर्गसुंदर वातावरणातील हे घर सिमला येथील मुख्य आकर्षण आहे. राष्ट्रपतींच्या तीन अधिकृत निवासस्थानापैकी हे सर्वात जुने आहे. त्याचे बांधकाम खास असून हे घर पूर्ण लाकडी आहे. त्यांच्या भिंती भूकंपरोधी आहेत. १८५० मध्ये हे घर बांधले गेले होते आणि भारताला स्वतंत्र मिळाल्यावर राष्ट्रपती भवन प्रमाणेच हे घर भारताच्या ताब्यात आले असे समजते.

हैद्राबाद येथे असलेले घर मात्र देशाला स्वातंत्र मिळाल्यानंतर निजामाकडून घेतले गेले आहे. संस्थान खालसा झाले तेव्हा हे घर राष्ट्रपती सचिवालयाकडे सोपविले गेले होते. याचे नाव आहे ‘राष्ट्रपती निलयम.’ १८६० साली बांधले गेलेले हे घर एकमजली असून त्यात ११ खोल्या आहेत. ९० एकर परिसरात हे घर आहे. त्याचे स्वयंपाकघर आणि जेवण खोली वेगळ्या इमारतीत असून या दोन्ही खोल्या भूयाराने जोडल्या गेल्या आहेत. येथे आसपास अतिशय सुंदर बगीचा आहे शिवाय एक हर्बल गार्डन सुद्धा आहे. त्यात १०० हून अधिक जातीच्या विविध वनौषधी लावल्या गेल्या आहेत.