सुनक यांच्या समर्थनार्थ पत्नी, मुले प्रचारात उतरली
ब्रिटीश पंतप्रधानपदासाठीची निवडणूक आता अंतिम चरणात आली असून या पदाचे उमेदवार ऋषी सुनक यांनी निवडणुकीचा प्रचार जोरात सुरु केला आहे. त्यांना या प्रचारात त्यांच्या कुटुंबियांची साथ मिळाली आहे. रविवारी पत्नी अक्षता आणि मुले सुनक यांच्या प्रचारात सामील झाले होते.
ऋषी सुनक यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकौंटवर या संदर्भातले काही फोटो शेअर केले आहेत. त्याखालच्या कॅप्शन मध्ये ते म्हणतात,’ ग्रांटहॅम येथील कालच्या कार्यक्रमात परिवाराचे समर्थन मिळाले, आभारी आहे, उपस्थित सर्व नागरिकांना धन्यवाद.’ या फोटो पैकी एका फोटोत अक्षता आणि मुली आसपासच्या नागरिकांशी संवाद साधताना दिसत आहेत.
अक्षता या भारतातील बलाढ्य आयटी कंपनी इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांची कन्या आहेत. ब्रिटन मधील श्रीमंत महिलांत त्यांचा समावेश होतो. टाईम्सच्या रिपोर्ट नुसार अक्षता ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ द्वितीय पेक्षा अधिक श्रीमंत आहेत. महाराणी एलिझाबेथ यांची संपत्ती ३५०० कोटी आहे तर अक्षता यांची संपत्ती ४३०० कोटी असल्याचे सांगितले जाते.