असे असते निवृत्त अमेरिकी राष्ट्राध्यक्षांचे जीवन

जगातील महासत्ता असे अमेरिकेचे वर्णन केले जाते त्यामुळे साहजिकच तेथील राष्ट्राध्यक्ष सुद्धा पॉवरफुल मानला जातो. अमेरिकेत राष्ट्राध्यक्षाची मुदत चार वर्षे आहे आणि एक व्यक्ती जास्तीत जास्त दोन वेळा राष्ट्राध्यक्ष बनू शकते. जेव्हा अमेरिकी राष्ट्राध्यक्ष त्याची टर्म पूर्ण केल्यावर निवृत्त होतो तेव्हा साहजिकच त्यांचे आयुष्य थोडे बदलते. पण निवृत्ती नंतर सुद्धा हे लोक जगभर व्याख्याने देणे, पुस्तके लिहिणे, व्यवसाय करणे यातून तगडी कमाई करतात आणि सुखासीन आयुष्य जगतात.

निवृत्त राष्ट्राध्यक्षाला जन्मभर पेन्शन मिळते शिवाय त्यांच्या ऑफिस आणि स्टाफचा खर्च सरकार देते. पत्नी सह त्यांना सर्व आयुष्यभर वैद्यकीय विमा मिळतो आणि त्यात सर्व प्रकारचे रोग अंतर्भूत असतात. शिवाय अन्य सरकारी लाभ दिले जातात. बराक ओबामा दोन टर्म नंतर निवृत्त झाले त्यानंतर त्यांनी सुपर बेस्ट सेलर पुस्तकांचे लिखाण करून प्रचंड पैसा मिळविला शिवाय पत्नी मिशेलसह ते टीव्ही आणि फिल्म शो प्रोडक्शन हाउस चालवितात.

डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्या वेळी राष्टपती निवडणुकीच्या तयारीत मग्न आहेत मात्र त्यांचा स्वतःचाच प्रचंड मोठा व्यवसाय सुद्धा आहे. जिमी कार्टर यांचे अटलांटा येथे ऑफिस आहे आणि त्याच्या खर्चापोटी सरकार त्यांना दरवर्षाला ७० लाख रूपये देते. जॉर्ज बुश यांची ह्युस्टन येथे ऑफिस असून त्यासाठी त्यांना वर्षाला दीड कोटी दिले जातात तर बिल क्लिंटन याचे न्यूयॉर्क येथे ऑफिस असून त्याच्या खर्चापोटी त्यांना साडेचार कोटी दिले जातात. शिवाय हे निवृत्त राष्ट्रप्रमुख लिमोसिन, मरीन वन आणि एअरफोर्स वन यातून प्रवास करु शकतात. त्यांच्या सुरक्षेचा खर्च सरकार करते. शिवाय त्यांना हवे असल्यास वॉशिंग्टन येथे सरकारी खर्चाने घर मिळू शकते.

क्लिंटन यांनी लिहिलेल्या ‘माय लाईफ’ पुस्तकासाठी त्यांना १० कोटी मानधन मिळाले होते तर बुश यांच्या ‘डिसिजन पॉइंटस’ पुस्तकाच्या १५ लाख प्रती खपल्या होत्या. ओबामा यांच्या पुस्तकाने त्यांना ६५ दशलक्ष डॉलर्स म्हणजे ५१८ कोटींची कमाई करून दिली आहे. तर बिल क्लिंटन यांनी भाषणे देऊन ८०० कोटींची कमाई केली आहे.