राष्ट्रपती बनताच द्रौपदी मुर्मू नोंदविणार पाच रेकॉर्ड

यशवंत सिन्हा यांचा पराभव करून राष्ट्रपती निवडणुकीत विजयी झालेल्या द्रौपदी मुर्मू यांचा आज भारताच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून शपथविधी होत आहे. हा शपथविधी होताच मुर्मू यांच्या नावावर पाच रेकॉर्ड जमा होणार आहेत. देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान होणाऱ्या त्या देशातील पहिल्या आदिवासी महिला आहेतच पण सर्वात लहान वयात राष्ट्रपती होणार आहेत. आजपर्यंत आदिवासी समाजातील कुणीही पंतप्रधान अथवा देशाचे गृहमंत्रीपद भूषविलेले नाही. २० जून १९५८ साली जन्म झालेल्या मुर्मू शपथ घेतेवेळी वयाची ६४ वर्षे, १ महिना आणि आठ दिवस पूर्ण करत आहेत. त्यापूर्वी बिनविरोध निवडून आलेले नीलम संजीव रेड्डी राष्ट्रपती झाले तेव्हा ६४ वर्षे, २ महिने आणि ६ दिवस वयाचे होते. सर्वात अधिक वयाचे राष्ट्रपती म्हणून के आर नारायणन यांचे नाव नोंदले गेले आहे. ते शपथ घेतेवेळी ७७ वर्षे ५ महिने आणि २१ दिवस वयाचे होते.

द्रौपदी मुर्मू स्वतंत्र भारतात जन्मलेल्या पहिल्या राष्ट्रपती बनल्या आहेत. २०१४ पर्यंत देशात जितके म्हणून पंतप्रधान, राष्ट्रपती झाले ते सर्व स्वातंत्र्यापूर्वी जन्म झालेले होते. पंतप्रधान मोदी स्वातंत्र्यानंतर जन्मलेले पहिले पंतप्रधान आहेत. मुर्मू ओरिसा मधून आलेल्या पहिल्या राष्ट्रपती आहेत. कोणत्याही राज्याच्या राज्यपाल बनलेल्या त्या पहिल्या आदिवासी महिला होत्या. तसेच प्रथम आमदार आणि मग राष्ट्रपती झालेल्या सुद्धा त्या पहिल्या महिला आहेत.

मुर्मू शिवभक्त असून पूर्ण शाकाहारी आहेत. श्रावणातल्या पहिल्या सोमवारी राष्ट्रपतीपदासाठी मतदान झाले होते आणि दुसऱ्या सोमवारी निवडणूक निकाल लागून त्या विजयी झाल्या होत्या हा योगायोग मानला जात आहे.