या देशांत राष्ट्रपती शपथेचा अश्या आहेत प्रथा

भारताच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू आज शपथ घेत आहेत आणि त्यांना सरन्यायाधीश रमन्ना शपथ देणार आहेत. देशोदेशी राष्ट्रपती पद शपथ विशिष्ठ प्रथेने घेतली जाते आणि त्यावेळी काही परंपरा आवर्जून पाळल्या जातात. जगातील महाशक्ती मानल्या जाणाऱ्या अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष बायबलवर हात ठेऊन शपथ घेतात आणि २० जानेवारी रोजी हा विधी होतो. ओबामा आणि ट्रम्प यांनी दोन बायबल घेऊन शपथ घेतली होती. ओबामा यांनी २००९ रोजी शपथ घेताना चुकीचे शब्द उच्चारले आणि त्यामुळे त्यांना २१ जानेवारीला परत शपथ घ्यावी लागली होती.

फ्रांसमध्ये राष्ट्रपती देशाचे प्रमुख असतात आणि त्याची मुदत पाच वर्षांची असते. पण येथे पदाची शपथ घेतली जात नाही तर पदग्रहण केल्याची घोषणा केली जाते. नवीन प्रमुखांना ग्रांड कॉलर ऑफ द लेझान ऑफ ऑनर हे सर्वोच्च ऑर्डर ऑफ मेरीट दिले जाते. नेपोलियनने १८०२ रोजी याची सुरवात केली होती. हे १६ साखळ्या असलेले सोन्याची चेन असते. यावेळी २१ तोफांची सलामी दिली जाते. रशिया मध्ये राष्ट्रपती हाच देशाचा प्रमुख असतो आणि जनतेतून त्याची निवड केली जाते. सहा वर्षे या पदाची मुदत असते आणि देशाच्या घटनेची प्रत हातात घेऊन शपथ दिली जाते. येथेही रशियाची ९ राष्ट्रीय चिन्हे आणि ६ गुच्छ असलेली सोन्याची चेन दिली जाते.

टांझानिया येथे राष्ट्रपती देशाचे प्रमुख असतात आणि त्यांची मुदत पाच वर्षे असते. दोन वेळच जास्तीत जास्त कुणी या पदावर येऊ शकतो. जनतेतून त्यांची निवड होते आणि शपथ घेतल्यावर मसाई जातीचे प्रमुख हत्यार ढाल आणि भाला त्यांना दिला जातो.

फिलिपिन्सचे राष्ट्रप्रमुख जनतेतून निवडले जातात आणि त्यांची मुदत सहा वर्षे असते. शपथ घेताना येथे अननसाच्या धाग्यापासून बनविलेला शर्ट वापरला जातो. हा त्यांचा राष्ट्रीय पोशाख आहे. बायबल हातात घेऊन येथे शपथ घेतली जाते.

इंडोनेशिया अध्यक्ष देशाचे प्रमुख असतात. त्यांची मुदत पाच वर्षे असते आणि जनता त्यांची निवड करते. येथे धार्मिक पुस्तक डोक्यावर काही उंचीवर पकडले जाते आणि त्या खाली शपथ घेतली जाते. सध्याचे अध्यक्ष जोको विडोडो मुस्लीम आहेत त्यामुळे त्यांनी डोक्यावर धरलेल्या कुराणाखाली शपथ घेतली होती.