अक्षयकुमार हायेस्ट इनकम टॅक्स पेअर, आयकर विभागाने दिले सन्मानपत्र

बॉलीवूड किंवा एकंदरीत मनोरंजन क्षेत्रातील लोक तगडी कमाई करतात हे ते आकारत असलेल्या फी वरून लक्षात येते. पण हे लोक कमाई प्रमाणे तगडा आयकर सुद्धा भरतात. बॉलीवूड खिलाडी अक्षयकुमार यंदा सर्वाधिक आयकर भरणारा कलाकार ठरला असून आयकर विभागाने तसे सन्मानपत्र त्याला दिले आहे. अर्थात अक्षय यावेळी शुटींग मध्ये व्यस्त असल्याने त्याच्या टीमने हे सन्मानपत्र स्वीकारले आहे. अक्षयने या वर्षी किती कर भरला याचा खुलासा झालेला नाही मात्र गतवर्षी त्याने २९.५ कोटी रुपये कर भरला होता. पृथ्वीराज चित्रपटासाठी त्याने ६० कोटी रुपये मानधन घेतले होते असेही समजते. वर्षाला अक्षय केवळ ५ किंवा ६ चित्रपट करतो. आणि कमाई मधला एक हिस्सा गरजूना मदत आणि दान देण्यासाठी खर्च करतो.

बॉलीवूड मधील अनेक अन्य कलाकार सुद्धा भरपूर आयकर भरतात. अक्षयकुमार गेली पाच वर्षे सर्वाधिक कर भरणारा कलाकार आहे. पण बिग बी यांनी सुद्धा २०१८-१९ मध्ये ७० कोटींचा कर भरला होता असे सांगतात. सल्लू भैय्या दरवर्षी सरासरी ४४ कोटी रुपये कर भरतो असे म्हटले जाते तर किंग खान म्हणजे शाहरुख २२ कोटी रुपये कर भरतो असे समजते. ऋतिक रोशन याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तो वर्षाला सरासरी २५.५ कोटी आयकर भरतो असे सांगितले जाते.