सौदी मध्ये जगातले आठवे आश्चर्य, १२० किमी लांब इमारत
सौदी अरेबिया मध्ये ८०० अब्ज पौंड म्हणजे ७६६ अब्ज रुपये खर्चून साईडवे स्कायस्क्रॅपर बांधण्याची योजना असून ही इमारत १२०किमी लांबीची असेल आणि त्यात ५० लाख लोक राहू शकणार आहेत. ‘मिरर लाईन’ असे या इमारतीचे नामकरण केले गेले आहे कारण तिच्या बांधकामात आरसे वापरले जाणार आहेत.
सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी जानेवारी २०२१ मध्ये या विशालकाय इमारतीची योजना मांडली होती. त्याचबरोबर इजिप्त मधील पिरामिड प्रमाणे बांधकाम केली जाणार असल्याचे सुद्धा सांगितले होते. ही इमारत वाळवंटी शहर ‘निओम’ चा एक हिस्सा असून यात १६०० फुट उंचीच्या दोन इमारती वाळवंटात एक दुसरीला समांतर बांधल्या जाणार आहेत. हे काम पूर्ण होण्यास ५० वर्षे लागतील असे समजते. कारण पृथ्वीची वक्रता लक्षात घेऊन हे बांधकाम करावे लागणार आहे.
या इमारतीची स्वतःची हायस्पीड रेल्वेलाईन असेल. २० मिनिटात एका टोकाकडून दुसऱ्या टोकाला पोहोचता येणार आहे. रीन्यूएबल विजेवर या इमारतीचे सर्व काम चालेल. येथे मैलोन्मैल हिरवळ, घरे आणि शेते असतील. येथे राहणाऱ्यांना तीन वेळच्या जेवणासाठी सबस्क्रिप्शन घ्यावे लागणार आहे असेही सांगितले जाते. ही इमारत कार्बन न्युट्रल असेल आणि जमिनीपासून १ हजार फुट उंचीवर स्टेडीयम बांधले जाणार आहे.