आपल्या जगामध्ये अनेक गोष्टी अश्या आहेत ज्या आपल्याला अचंब्यात टाकल्याशिवाय राहत नाहीत. …मग ती गोष्ट कुठल्या नैसर्गिक आपदेशी निगडीत असो, किंवा कुठल्या बऱ्या न होऊ शकणाऱ्या व्याधीविषयी असो, आपल्याला या गोष्टींबद्दल कुतूहल वाटते. आपल्याला आश्चर्य करायला लावणाऱ्या अश्याच काही गोष्टी.
तुम्हाला आश्चर्यचकित करतील ‘या’ गोष्टी
शीतयुद्धाच्या वेळी जवळजवळ पन्नास परमाणु अस्त्रे अचानक नाहीशी झाली. त्यांपैकी काही परमाणु अस्त्रे घनदाट लोकवस्तीमधे असण्याचा संभव असल्याचे म्हटले जाते. १९५०-६० च्या दशकांमध्ये शीत युद्धाच्या काळामध्ये अमेरिकन बॉम्बर विमाने परमाणु अस्त्रांची वाहतूक करीत असत. त्यांच्या मार्गामध्ये, त्यांना अटलांटिक महासागरावरून उड्डाण करावे लागत असे. या प्रवासाला वेळ लागत असल्याने इंधन कमी पडत असे. हे इंधन विमानांमध्ये हवेतून उड्डाण करीत असतानाच भरले जात असे. पण काही वेळा असे ही घडले, की इंधन भरण्यासाठी येणारी टँकर विमाने वेळेवर पोहोचू न शकल्याने बॉम्बर विमाने, इंधन संपल्यामुळे, त्यामधल्या परमाणु अस्त्रांसकट समुद्रातच कोसळत असत. यामधील काही बॉम्बर विमाने, इंधन भरले जात असताना तांत्रिक बिघाड झाल्याने कोसळल्याच्या घटनाही घडल्या आहेत. ही बॉम्बर विमाने स्पेन, ग्रीनलँड, जपान, अलास्का या भागांमध्ये कोसळली असल्याचे सांगितले जाते. या विमानांमध्ये असलेल्या काही परमाणु अस्त्रांचा शोध लागला, पण काही परमाणु अस्त्रे मात्र जी गायब झाली, ती कायमचीच.
टीव्हीवर, चित्रपटांमध्ये कित्येकदा कोणाला तरी हृदयविकाराचा झटका आलेला दर्शविण्यात येतो. मग सीपीआर देऊन नायक किंवा नायिका त्या व्यक्तीचे प्राण वाचवितात. बहुतेक चित्रपटांमध्ये हृदयविकाराचा झटका आलेली व्यक्ती पुनश्च जिवंत झालेली दाखविले जाते. पण वस्तुस्थिती मात्र यापेक्षा फार वेगळी आहे. वस्तुस्थितीत मात्र हृदयविकाराचा झटका आलेल्या व्यक्तींना सीपीआर दिल्याने त्या व्यक्तीचे प्राण वाचतीलच असे नाही. एक तर त्या व्यक्तीच्या आसपास उपस्थित असणाऱ्या लोकांमध्ये सीपीआर देण्याची पद्धत माहित असणाऱ्यांची संख्या किती आहे हा महत्वाचा भाग आहे. सीपीआर जर वेळेवर दिला गेला नाही तर रुग्णाचे वाचू शकत नाहीत. कित्येकदा असे ही घडत असल्याचे डॉक्टर म्हणतात, की छातीवर वाजवीपेक्षा जास्त जोर दिला गेल्याने रुग्णाच्या बरगड्या मोडतात, आणि रुग्णाला गंभीर दुखापत होते. सीपीआर देण्यामागे मुख्य हेतू हा, की हृदयाचे रक्ताभिसरण करण्याचे काम सुरु राहावे, कारण यामुळे मेंदू आणि शरीरातील पेशींना प्राणवायूचा पुरवठा होतो. पण सीपीआर देण्याची योग्य पद्धत माहित नसताना रुग्णाला सीपीआर देणे धोकादायक असते.
शास्त्राद्वारे आता असे सिद्ध करण्यात येत आहे, की मानवी शरीरामध्ये अँटी बायोटीक्स साठीची प्रतिकारशक्ती इतकी वाढीला लागलेली आहे, की काही वर्षांनी सिजेरीयन, केमोथेरपी, यांसासारखे उपचार अतिशय धोकादायक ठरू शकणार आहेत. अँटी बायोटिक्सचा गैरवापर ही समस्या गेली काही वर्षे वैद्यकीय तज्ञांना भेडसावत आहे. अँटी बायोटिक्स च्या गैरवापरामुळे मानवी शरीरामध्ये अनेक नवनवीन तऱ्हेचे बॅक्टेरीया तयार होत आहेत, ज्यांच्यामध्ये अँटी बायोटिक्सना प्रतिकार करण्याची शक्ती आहे. आपण केवळ आजारी असतानाच अँटी बायोटिक्स घेत असतो ही समजूत चुकीची आहे. आपल्या आहाराद्वारे ही अनेक औषधे आपल्या शरीरामध्ये प्रवेश करीत असतात. उदाहरणार्थ मांसाहारी व्यक्तींचा आहार ज्या जनावरांपासून येतो, त्या जनावरांना ही कधी ना कधी रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी अँटी बायोटिक्स दिले गेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अँटी बायोटिक्सच्या अति वापरामुळे शस्त्रक्रिया करणेही अवघड बनत चालले आहे, कारण शस्त्रक्रियेपूर्वी शरीरामध्ये कुठल्याही जीवाणूंचा संसर्ग कमी करण्यासाठी अँटी बायोटिक्स दिले जातात. पण अँटी बायोटिक्सना प्रतिकार करणारे बक्टेरीया शरीरामध्ये तयार होत असल्याने त्या औषधोपचाराचा शरीराला उपयोग होत नाही.
अमेरिकेमध्ये दरवर्षी साठ मिलियन टन इतक्या अन्नाची नासाडी होते, किंवा तितक्या प्रमाणामध्ये अन्न चक्क फेकून दिले जाते. या मुळे होणारे आर्थिक नुकसान जवळ जवळ १६० मिलियन डॉलर्स इतके प्रचंड आहे. अमेरिकेमध्ये मका, गहू, दूध, सोयाबीन हे खाद्यपदार्थ सवलतीच्या दरांमध्ये उपलब्ध आहेत. या खाद्यपदार्थांची किंमत अगदी माफक असते, त्यामुळे हे खाद्यपदार्थ जरी वाया जात असले तरी त्यावर कोणी ही हरकत घेत नाही. तसेच, आकाराने जराशी विचित्र असलेली भाज्या किंवा फळे चवीला चांगली असली तरी, केवळ दिसायला चांगली नाहीत या कारणाकरिता फेकून देण्याची तेथील लोकांची मानसिकता असल्याचे सांगितले जाते.