बहुगुणी डाळींब


डाळींब हे सर्वाधिक गुणकारी फळ असून भारतीय पुराणांमध्ये अन्य कोणत्याही फळापेक्षा डाळींबाचा अधिकवेळा प्रकर्षाने उल्लेख आलेला आहे. डाळींबामध्ये रोग प्रतिकारकशक्ती वाढवण्याची क्षमता मोठी आहे. डाळींबामध्ये अ, क आणि ई ही जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात असतात. शिवाय फोलिक ऍसिड हे डाळींबाचे वैशिष्ट्य आहे. आपल्याकडे सध्या ग्रीन टीचे प्रस्थ वाढत चालले आहे. परंतु डाळींब हे ग्रीन टी पेक्षा तिपटीने अधिक गुणकारी आहे. डाळींबाच्या नित्य सेवनाने अनेक रोगांची शक्यता कमी होते. विशेषतः महाराष्ट्रामध्ये डाळींब मोठ्या प्रमाणावर आणि कमी किंमतीत उपलब्ध होते. डाळींबाचे फायदे खालीलप्रमाणे आहेत.

डाळींब आपल्या शरीरातील रक्ताची घनता कायम टिकवते. रक्ताच्या गुठळ्या होण्याची प्रक्रिया डाळींबामुळे मंद होते. माणूस जसजसा वयाने वाढत जातो. तसतसे त्याचे शरीरातले अवयव क्षीण होत जातात आणि त्याची वाटचाल वृध्दत्वाकडे होते. ही वाटचाल रोखून तारुण्य टिकवायचे असेल तर डाळींब उपयुक्त ठरते. शरीरातील विविध सांध्यांमध्ये असलेले तेलकट वंगण कमी व्हायला लागले की सांधे कुरकुरायला लागतात. त्यांचे हे कुरकुरणे डाळींबाच्या सेवनाने कमी होऊ शकते. आपल्या शरीरातील चयापचय क्रिया या प्राणवायूच्या घेण्यातून आणि कर्ब वायूच्या उत्सर्जनातून घडत असते. डाळींबाच्या सेवनाने ऑक्सिजन अधिक प्रमाणात घेतला जाऊन तो रक्तात अधिक प्रमाणात पाठवला जातो. त्यामुळे रक्ताची शुध्दता वेगाने होते.

डाळींबाच्या रसाच्या सेवनाने माणसाच्या शरीरात लैंगिक अक्षमता रोखली जाते आणि लैंगिक सुखात वाढ होते. भारतात सध्या हृदयविकाराचे प्रमाण वाढत चालले आहे. ही वाढ रोखण्यासाठी आणि हृदरोगाचे प्रमाण आणि तीव्रता कमी होण्यासाठी डाळींबाचा वापर उपयुक्त ठरू शकतो. डाळींबाच्या सेवनाने प्रोस्टेट ग्रंथीचा कर्करोग टळू शकतो असे आयुर्वेदिक तज्ञांचे म्हणणे आहे. डाळींबामध्ये असलेली पोषणद्रव्ये खालीलप्रमाणे आहेत. एक कप डाळींबाच्या रसामध्ये २४ ग्रॅम साखर आणि १४४ अंश कॅलरीज असतात. ७ ग्रॅम फायबर, ३ ग्रॅम प्रथिने, फोलेट, पोटॅशियम, व्हिटॅमीन सी ३०, व्हिटॅमीन के ३६ एवढी पोषण द्रव्ये असतात. एका संशोधनामध्ये असे आढळले आहे की, डाळींबाच्या नित्य सेवनाने वाढत्या वयातसुध्दा स्मरणशक्ती शाबूत ठेवण्यात डाळींब उपयुक्त ठरते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment