मुलांना पर्यावरणाच्या रक्षणाचे धडे कसे द्याल?


मुलांना अगदी लहानपणापासूनच पर्यावरणाच्या बाबतीत जागरूक राहण्यासाठी प्रोत्साहित करणे ही घरातील वडिलधाऱ्यांची जबाबदारी आहे. असे म्हणतात की शाळेत जाण्याआधी मुलांचे शिक्षण घरामध्येच सुरु होते. घरातील वडील मंडळी आपल्या अनुभवांनी, ज्ञानाने बाहेरील जगाशी मुलांची ओळख करून देत असतात. कळत – नकळत मुले आपल्या घरातील किंवा परिचयाच्या वडील माणसांचे विचार, सवयी आत्मसात करीत असतात. त्यामुळे योग्य आहार, नियमित व्यायाम या शिकवणीबरोबरच मुलांना पर्यावरणाच्या आणि नैसर्गिक स्रोतांच्या संवर्धनाचे बाळकडूही जर पाजले गेले तर हीच मुले मोठी होऊन जबाबदार नागरिक होतील आणि पर्यावरण रक्षणाच्या कामी आपले योगदान देतील. काही लहान लहान सवयी मुलांना अगदी लहानपणापासूनच आत्मसात करण्यास आपण प्रवृत्त करावयास हवे.

इको फ्रेंडली बनण्यासाठी मुलांना सगळ्यात आधी एक सवय लावायला हवी, ती म्हणजे वीज वाचविण्याची. खोलीतून बाहेर पडताना खोलीतील दिवे, पंखे, टीव्ही इत्यादी विद्युत उपकरणे बंद करण्याबद्दल आग्रही असावे. आपल्यालाही तशी सवय असेल तर ही सवय मुले पण लवकर आत्मसात करतील. त्याचप्रमाणे आंघोळ करताना किंवा दात घासताना पाण्याचा नळ उघडा न ठेवण्याबद्दलही आग्रही असावे. पाण्याचा एक एक थेंब किमती आहे हे मुलांना पटवून द्यावे.

प्लास्टिकच्या पिशव्या वापरण्यापासूनही मुलांना परावृत्त करावे. त्या ऐवजी खरेदीस बाहेर पडताना कापडी किंवा कागदी पिशव्या बरोबर नेण्याचा आग्रह धरावा. स्वयंपाकघरामध्ये सेंद्रिय भाजीपाल्याचा वापर करावा. आपल्याकडे भाज्या किंवा फळांची झाडे लावण्यास जागा असेल तर भाज्या किंवा फळांची झाडे लावावी. बागकाम हा एक अतिशय उत्तम विरंगुळा आहे. या विरांगुळ्यात मुलांनाही सहभागी करून घ्यावे.

निसर्गाचा सहवास मुलांना कसा मिळेल हे पहावे. दररोज किंवा वेळ होईल तसे मुलांना जवळच्या उद्यानात घेऊन जावे. सुट्टीच्या दिवसांमध्ये मुलांना केवळ थीम पार्क किंवा मॉल्समध्ये घेऊन न जाता निसर्गाच्या सान्निध्यात घेऊन जावे. लहान सहली, ट्रेक्स आयोजित करावेत. आपल्या मुलांना निसर्गाशी मैत्री होईल असे छंद जोपासण्यास प्रोत्साहित करावे. बागकाम हा असाच एक छंद आहे.

Leave a Comment